नाशिक : जिल्ह्यात पावसाअभावी पूर्व भागातील तालुक्यांमध्ये टंचाईची परिस्थिती दिवसेंदिवस भयानक होत असल्याने जिल्हा परिषद अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांनी तालुका निहाय टंचाईच्या बैठका घेण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी (दि.७) निफाड व येवला तालुक्यात जाऊन संबंधित तालुक्यातील अधिकाऱ्यांच्या टंचाई व दुष्काळ निवारण संदर्भात बैठका घेऊन एकूणच पाणीटंचाई व पीक परिस्थितीबाबत आढावा घेतला. उद्या (दि.८) अध्यक्ष विजयश्री चुंबळे सिन्नर तालुक्यात जाऊन टंचाई आढावा बैठक घेणार आहेत. मात्र उद्याच जिल्हा परिषदेची स्थायी समितीची सभा असल्याने या बैठकीबाबत अनिश्चितता असली तरी ही बैठक दुपारी २ वाजता असल्याने सकाळच्या सत्रात सिन्नर तालुक्यात जाऊन विजयश्री चुंबळे टंचाईबाबत बैठक घेण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे परवा (दि.९) चांदवड व नांदगाव तालुक्यातील टंचाई संदर्भात आढावा बैठक घेणार असल्याचे समजते. जिल्हा परिषदेत ४ सप्टेंबर रोजी अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांनी दुष्काळ व टंचाई संदर्भात आढावा बैठक बोलविली होती. मात्र या बैठकीस बहुतांश विभागाच्या अधिकाऱ्यांनी बैठकीस दांडी मारल्याने बैठक आटोपती घ्यावी लागली होती. त्याच पार्श्वभूमीवर अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांनी दुष्काळ संदर्भात आढावा बैठका घेण्याचा निर्णय घेतला आहे.(प्रतिनिधी)
तालुकानिहाय टंचाई बैठकांचा कार्यक्रम
By admin | Published: September 07, 2015 11:16 PM