लोकमत न्यूज नेटवर्कतळवाडेदिगर : बागलाण तालुक्यातील तळवाडेदिगर येथे वीज वितरण कंपनीकडून गावात जीर्ण झालेल्या विद्युत तारा काढून नव्याने केबलिंग करून सिंगलफेज रोहित्रांची दुरूस्ती केली. यामुळे वीजचोरीवर आळा बसला आहे; मात्र या कारवाईमुळे अर्धे गाव अंधारात, तर अर्धे गाव प्रकाशात आहे. पूर्ण गाव प्रकाशमान होण्याची प्रतीक्षा ग्रामस्थांना आहे.आठ वर्षांपासून गावात मोठ्या प्रमाणात विजेची चोरी होत होती. यामुळे वारंवार सिंगल फेज रोहित्र निकामी होत असल्याने गावात पंधरा ते वीस दिवस वीजपुरवठा बंद राहत असे. तसेच वेळोवेळी जीर्ण झालेल्या तारांवर अपघात घडत असल्याने पिण्याच्या पाण्यासह गावातील गिरण्या बंद राहत असत. त्यामुळे ग्रामस्थांना बाहेरगावाहून पाण्याचे जार विकत घ्यावे लागत असत. तसेच दळणासाठीही बाहेरगावी जावे लागत होते. याबाबत गावकऱ्यांनी अनेक वेळा वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात तक्रारी देऊनही यावर कुठलीही कार्यवाही होत नसल्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले होते. ग्रामसभेत वायरमन महेश बिरारींच्या बदलीबाबत ठराव करून वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिला होता. याची दखल घेत वीज वितरण कंपनीने वायरमन बिरारी यांची तत्काळ बदली करून त्यांच्या ठिकाणी हेमंत खैरनार यांची नियुक्ती केली. ग्रामपंचायतीसह इतर सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकाºयांच्या सहकार्याने गावात केबलिंग करून वीजचोरीवर खैरनार यांनी आळा घालून कामांनाही वेग दिला. वीजचोरी करणाºयांना आळा घातल्याने ते अंधारात आले आहेत. यामुळे वीज वितरणकडे नवीन मीटरसाठी मागणीही केली आहे. कनिष्ठ अभियंता एस.के. सवंद्रे, उद्धव आहिरे, मयूर बागुल, तेजस देवरे, हेमंत सावकार, हर्षद सोनवणे आदींनी वीजपुरवठा सुरळीत केला.