मालेगावहून जुने मोबाईल खरेदी करण्यासाठी आठजण मुंबईत गेले होते. शहरातील भंगार बाजारात जुने माेबाईल विक्रीचा व्यवसाय करणारे व्यापारी जुने मोबाईल आणून शहरात विकतात. मुंबईहून जुने मोबाईल खरेदी करून आठजण टेम्पो ट्रॅव्हलर (क्र. एमएच ४३ एन ३७४६) ने मालेगावकडे परतत होते. तालुक्यातील सौंदाणे शिवारात आल्यानंतर सकाळी आठ वाजेच्या सुमारास टेम्पोमधील डिझेल संपल्याने चालकाने रस्त्याच्या कडेला टेम्पो घेण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याला अपयश आले. इतरांच्या मदतीने कसाबसा टेम्पो रस्त्याच्या कडेला घेऊन त्याला पंप मारला. परंतु तरीही टेम्पो सुरू होत नसल्याने गाडीतील आठही प्रवाशांना खाली उतरवून टेम्पोला धक्का मारण्यास सांगितले. चालकही खाली उतरला. सर्वजण टेम्पोला धक्का देत असताना पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या टँकर क्र. (एमएच १८ बीजी २३९२) ने त्यांंना जोरदार धडक दिली. यात मोबाईल व्यापारी अयुबखान युनुस खान (२९) आणि इस्तियाक अहमद मोहंमद इलियास रा. मालेगाव हे दोघे ठार झाले, तर तीनजण गंभीर जखमी असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. धडक देऊन टँकरचालक फरार झाला. मात्र त्याची नंबरप्लेट तुटून खाली पडल्याने त्याच्याविरोधात तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
सौंदाणे शिवारात टेम्पाेला टँकरची धडक; दोन ठार, तीन जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 4:11 AM