नाशिक : केरळमधील अलपुझा येथे झालेल्या राष्ट्रीय टेबल-टेनिस स्पर्धेत रविवारी रात्री झालेल्या अंतिम सामन्यात नाशिकच्या तनिषा कोटेचा हिने १७ वर्षांखालील गटात विजेतेपदाला गवसणी घातली आहे. कोलकाताच्या नॅशनल कोचिंग सेंटरच्या शुभंकृता दत्ता हिला ४-० असे चारीमुंड्या चीत करीत महाराष्ट्राच्या तनिषाने राष्ट्रीय स्पर्धेतील पहिल्या मोठ्या विजयाची नोंद करीत नाशिकला टेबल-टेनिसच्या स्पर्धांतील आतापर्यंतचे दुसरे राष्ट्रीय विजेतेपद मिळवून दिले आहे.
तनिषाने अंतिम सामन्यात अटॅकिंग गेमचे जबरदस्त दर्शन घडवत संपूर्ण सामनाच एकतर्फी करून टाकला. त्याआधी तनिषाने उपांत्य सामन्यात उत्तर प्रदेशच्या वर्तिका भरत हिला ११-५, ११-९, ११-४, ११-४ असे सहज पराभूत केले होते. तीच लय तिने अंतिम सामन्यातही कायम राखली. त्यामुळेच अंतिम सामन्यात तनिषाने शुभंकृताला ११-६, ११-६, ११-५, ११-४ असे सलग चार गेममध्ये पराभूत करीत एकतर्फी विजयाची नोंद केली. तनिषापूर्वी गतवर्षी सायली वाणी हिने १५ वर्षांखालील वयोगटाचे विजेतेपद पटकावत टेबल-टेनिसमधील मुलींचे पहिले राष्ट्रीय विजेतेपद मिळवून दिले होते. नाशिक जिमखान्यात तनिषा ही प्रशिक्षक जय मोडक यांच्या मार्गदर्शनाखाली नियमित सराव करते. तनिषाच्या यशाबद्दल जिमखान्याचे अध्यक्ष नरेंद्र छाजेड आणि सचिव शेखर भंडारी यांनी तिचे अभिनंदन केले.
इन्फो
तनिषाची झळाळती कारकीर्द
नुकतीच तनिषा आणि सायली यांची महाराष्ट्राच्या १७, १९ व महिला गटाच्या संघात निवड झाली होती. एका सिझनमध्ये तीन तीन संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या त्या दोघी नाशिकच्या पहिल्या महिला खेळाडू ठरल्या होत्या. त्यात तनिषा ही सध्या राज्यात १७ व १९ वयोगटात अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर असून राष्ट्रीय स्तरावर चौथ्या व पाचव्या स्थानावर आहे. सध्या ती जागतिक क्रमवारीत अनुक्रमे त्रेचाळीस व सत्याहत्तर स्थानावर आहे. या विजेतेपदामुळे तिला राष्ट्रीय क्रमवारीतही वरचे स्थान मिळू शकणार आहे. तनिषाने नुकताच दोहा, ऑस्ट्रिया, जर्मनी व स्पेन येथे झालेल्या डब्ल्यूटीटी युथ कंडेंडर स्पर्धेत सहभाग नोंदविला होता.
फोटो
१९तनिषा