नाशिक : शहरातील गणपती विसर्जनाची जय्यत तयारी सुरू असून नदी प्रदूषण टाळण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. शहरातील २८ नैसर्गिक व ४३ कृत्रिम ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच देव द्या देवपण घ्या असा उपक्रम मूर्तीदानासाठी राबवण्यात येणार आहे. तसेच मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांमध्येच मूर्ती विसर्जनाची सोय व्हावी यासाठी टँक ऑन व्हील उपक्रम राबवण्यात येणार आहे.
नाशिक महापालिकेचे आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी गणेश विसर्जनाच्या तयारी संदर्भात आढावा बैठक घेतली असून आज त्यांनी स्वत: विविध ठिकाणी भेटी देऊन आढावा घेतला. गेादावरी आणि उपनद्यांमध्ये प्रदूषण टाळण्यासाठी तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून २८ नैसर्गिक ठिकाणी घोषित केली अहोत. तसेच ४३ ठिकाणी कृत्रिम हौद तयार करण्यात आले आहेत.
नदीपात्रात कोणत्याही प्रकारच्या मूर्तीचे विसर्जन होऊ नये यासाठी महापालिकेने सेवाभावी संस्थांची मदत घेतली असून सहाशे स्वयंसेवक महापालिकेला तैनात करण्यात आले आहेत. कोणताही अनूचीत प्रकार घडू नये यासाठी १६ जीवरक्षक तैनात करण्यात आले आहेत. भाविकांनी या ठिकाणी मूर्ती दान स्वरुपात देण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.