श्याम बागुल, नाशिक : जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलैच्या पहिल्या आठवड्यात काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी हलकी हजेरी लावणाऱ्या पावसाने खरिपाच्या पेरण्यांनी अद्याप वेग घेतलेला नसला तरी, तीन तालुक्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काहीअंशी सुटण्यास मदत झाली आहे.
काही ठिकाणी टँकरची संख्याही घटली आहे. आठवडाभरातच ३४ गावे, वाड्यांना पिण्याचे पाणी उपलब्ध झाल्याने १३ टँकर बंद करण्यात आले आहेत. यंदा कडक उन्हाळ्यामुळे मार्च महिन्यापासूनच येवला, नांदगाव व मालेगाव तालुक्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू लागली होती. परंतु शासन पातळीवर टँकर मंजुरीचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना असल्यामुळे टँकर मंंजुरीस उशीर होत असल्याची लोकप्रतिनिधींची ओरड होती. त्यामुळे प्रांत अधिकाऱ्यांना त्याचे अधिकार प्रदान करण्यात आले. परिणामी मार्चअखेर ग्रामीण भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला.