नाशिक : मागीलवर्षी समाधानकारक पाऊस पडल्याने धरणे तृप्त झाली असली तरी मे महिन्यात धरणांमधील साठा कमी झाल्याने जिल्ह्यात पावसाळ्याच्या तोंडावरच टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. सर्वाधिक टॅंकर्स येवला तालुक्यात सुरू असून, ७१ गावे आणि ४५ वाड्यांना ५२ टॅंकर्सद्वारे पाणीपुरवठा होत आहे. जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पाणीटंचाई असली तरी मे महिन्यात टँकर्सची मोठी मागणी नव्हती. जिल्ह्यातील धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा असल्याने तसेच यंदा आवर्तनही घटल्यामुळे पाणीटंचाई जाणवणार नसल्याचे वाटत होते. परंतु मे महिना संपता संपता जिल्ह्यात टँकर्स सुरू झाले आहेत. सद्य:स्थितीत ५२ टॅंकरद्वारे ७१ गावे व ४५ वाड्यांना टॅंकर्सने पाणीपुरवठा करावा लागत आहे.
यापूर्वी येवला तालुक्यात सर्वप्रथम टँकर सुरू करण्यात आला होता. आता येथील टॅंकर्सची संख्या सर्वाधिक १८ इतकी आहे. अशातच पावसाचे उशिरा आगमन झाले तर जिल्ह्यातील टॅंकर्सची संख्या वाढण्याचीदेखील शक्यता आहे. उन्हामुळे नदी व नाले आटले असून, विहिरींनी तळ गाठला आहे. त्यामुळे दहा तालुक्यांमधून टॅंकर्सची मागणी झाली. त्यानुसार त्यांना टॅंकर्स पुरविण्यात आले असून, ५२ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. शासकीय व ४५ खासगी टॅंकरने गाव, वाड्या व वस्तींवर पाणी पोहोचवले जात आहे. मागील वर्षी टॅंकर्सची संख्या पन्नासच्या जवळपास होती. रोज टॅंकर्सच्या १२२ फेर्या होत असल्याने गाव वाड्यांमधील ९६ हजार ग्रामस्थांची तहान भागवली जात आहे. जिल्ह्यातील बागलाण, चांदवड, देवळा, इगतपुरी, मालेगाव, नांदगाव, पेठ, सुरगाणा, त्र्यंबक, येवला या तालुक्यांमध्ये टँकरने पाणीपुरवठा होत आहे.