येवला : तालुक्यातील १३ गावे आणि दोन वाड्यांना टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू आहे. तर तालुक्यातील नगरसूल, सायगाव, राजापूर येथील १४ वाड्या-वस्त्यांसह सोमठाण जोश गावाला पाणी टंचाई जाणवू लागल्याने त्यांचे टँकर मागणी प्रस्ताव पंचायत समितीकडे दाखल झाले आहेत.
तालुक्यात वाढत्या उन्हाच्या चटक्याबरोबरच पाणी मागणाऱ्या गावांच्या संख्येत वाढ होत आहे. यंदाही वाढत्या उन्हाबरोबरच पाणी मागणाऱ्या गावांची संख्या वाढती आहे. सद्य:स्थितीत तालुक्यातील ममदापूर, जायदरे, हडपसावरगाव, कोळगाव, वाईबोथी, खरवंडी, देवदरी, भुलेगाव, कोळम खुर्द व बुद्रुक, तळवाडे (शिवाजीनगर), रेंडाळे, आडसुरेगाव, पिंपळखुटे बुद्रुक (पगारेवस्ती) या १३ गावे आणि दोन वाड्यांना टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. तीन शासकीय व चार खासगी अशा एकूण सात टँकरद्वारे १८ खेपा रोज केल्या जात आहेत. तालुक्यातील नगरसूल येथील दहा वाड्या-वस्त्या, सायगाव येथील महादेव वाडी, राजापूर येथील तीन वाड्या- वस्त्या आणि सोमठाण जोश या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागल्याने या गाव-वाड्यांचे पाणी मागणी प्रस्ताव पंचायत समितीकडे दाखल झालेले आहेत.
पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर पंचायत समितीने केलेल्या आराखड्यात तिसऱ्या टप्प्यात ४७ गावे आणि २८ वाड्या-वस्त्यांना टँकरने पाणी पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.