सिन्नर : सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी आठ हजार रुपयांची लाच खाजगी व्यक्तीमार्फत स्विकारताना सिन्नर तालुक्यातील मनेगाव येथील तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पकडले. गुरुवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास मनेगाव येथील खंडेराव महाराज मंदिरात सदर घटना घडली. डुबेरे येथील तलाठी संदीप बाळासाहेब मेढे (२६) याच्याकडे मनेगावचा अतिरिक्त कारभार आहे. धोंडवीर शिवारात तक्रारदार याची गट नं. ११०७ मध्ये वडीलोपार्जित शेती आहे. त्यातील एक हेक्टर शेती तक्रारदार यास वाटेहिश्याने मिळाली आहे. सदरची एक हेक्टर शेती तक्रारदाराने दुय्यक निबंधक कार्यालयात त्याच्या पत्नीच्या नावाने केली आहे. त्याबाबतची नोंद महसूल दप्तरात होण्यासाठी तक्रारदाराच्या पत्नीने तलाठी कार्यालयात अर्ज करुन सातबारा उतारा मिळावा अशी मागणी केली होती. सदर नोंदीसाठी संशयित आरोपी व तलाठी संदीप मेढे याने दहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यानंतर आठ हजार रुपयांत तडजोड झाली होती. याबाबतची तक्रार गुरुवारी सकाळी नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे प्राप्त झाली होती. लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे पोलीस निरीक्षक अशोक पवार, नितीन देशमुख, हवालदार आण्णासाहेब रेवगडे, विकास कंदीलकर यांच्यासह कर्मचाऱ्यांनी तक्रारीची खात्री करुन ताबडतोब सापळा रचला. दुपारी अडीचच्या सुमारास जाधव याने लाच स्विकारली. याप्रकरणी संशयित आरोपी तलाठी मेढे व जाधव यांस ताब्यात घेण्यात आले. रात्री उशिरा सिन्नर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा नोंदविण्याचे काम सुरु होते. (वार्ताहर)
मनेगाव येथील तलाठी लाच घेतांना जाळ्यात
By admin | Published: February 25, 2016 11:38 PM