सटाणा : गेल्या तीन आठवड्यापासून शहरातील पालिकेच्या सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या नळांना पाणीच आलेले नाही, त्यामुळे शहरवासीयांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. टंचाई काळात पालिका प्रशासन पाणीपुरवठ्याची कोणतीही पर्यायी व्यवस्था करण्यात हतबल ठरल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी पालिका कार्यालयात नगराध्यक्ष सुनील मोरे यांच्या दालनाबाहेर तीव्र आंदोलन छेडले आणि नगराध्यक्षांच्या नामफलकाला निवेदन चिकटवून पुष्पहार घातला. दरम्यान सकाळी पिंपळेश्वर मधील नागरिकांनी पालिका प्रवेशद्वारासमोर मुख्याधिकारी हेमलता डगळे यांच्या वाहनाला घेराव घालून पाणीपुरवठ्याबाबत धारेवर धरले. नागरिकांच्या या स्वयंस्फूर्त आंदोलनांची शहरात दिवसभर चर्चा सुरु होती.पुनंद आणि चणकापुर या दोन्ही धरणांतून सोडण्यात येणारे पाण्याचे आवर्तन नव्वद दिवसांनी लांबल्यामुळे सटाणा शहरात अभूतपूर्व पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नववसाहतीतील काही भागात तर तब्बल तीन आठवड्यानंतरही नळांना पाणीच आलेले नाही. त्यामुळे सकाळी पिंपळेश्वर मधील संतप्त महिला , नागरिकांनी सकाळी थेट पालिका कार्यालय गाठले. याचवेळी मुख्याधिकारी हेमलता डगळे या चार फाटा परिसरातून आपल्या वाहनाने लोकसभा निवडणूकीच्या बैठकीसाठी नाशिककडे निघाल्या असताना महिला व नागरिकांनी त्यांच्या वाहनाला घेराव घालण्याचा प्रयत्न केला. पाणीप्रश्नाबाबत सरबत्ती सुरू केली. दरम्यान, दुपारी चार वाजता शहरातील विविध प्रभागांमधील संतप्त महिला व नागरिकांनी थेट पालिका कार्यालयात येऊन नगराध्यक्ष सुनील मोरे यांना भेटण्याचा प्रयत्न केला.मात्र नगराध्यक्ष मोरे हे त्यांच्या दालनात नव्हते. काही नागरिकांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, वारंवार संपर्क करूनही मोरे यांचा फोन बंद आल्याने नागरिक अधिकच संतप्त झाले. त्यांनी पाणीपुरवठा अधिकारी संजय सोनवणे यांना घेराव घालून आम्हाला पाणी कधी मिळणार, याबाबत विचारणा केली. सर्वच स्त्रोत आटल्यामुळे भीषण टंचाई निर्माण झाल्याचे सोनवणे यांनी मान्य केले. अखेर नगराध्यक्षांच्या नामफलकास महिला व नागरिकांनी निवेदन चिकटवून पुष्पहार घातला आणि गांधीगिरी आंदोलन छेडले.
सटाण्यात पाणीप्रश्नी महिलांचा टाहो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 3:40 PM