नांदगाव (संजीव धामणे) : तालुक्यात यंदा खरीप हंगामात ५९,८०६ हेक्टर क्षेत्रावरचे पेरणीचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. बोलठाण, वेहेळगाव, जातेगाव या मंडळांमध्ये रोहिणी नक्षत्र मध्येच पेरणीयोग्य पाऊस झाल्याने, १० जूनपर्यंत ९० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या होत्या. जूनअखेर १६८ टक्के पाऊस तालुक्यात झाला. त्यामुळे खरीप कामांना वेग आला आहे. यंदा सोयाबीन, मूग, तूर या पिकांच्या क्षेत्रात वाढ झाली असून, सोयाबीन १७० हे. मूग ५,७०० हे. व तूर ८३९ क्षेत्रावर लागवड झाली आहे. कपाशीचे क्षेत्रात घट झाली आहे.
‘कमी खर्च अधिक उत्पादन’ या धोरणानुसार, मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात कृषी तंत्रज्ञान प्रसारासाठी बियाणे उगवण क्षमता चाचणी, बीजप्रक्रिया मोहीम, रासायनिक खतांमध्ये दहा टक्के बचत अंतर्गत जैविक खतांचा वापर व हिरवळीच्या खतांचा वापर, युरिया तणनाशकासोबत कोरड्या मातीत फेकणे थांबविणे यासाठी मोहीम राबविण्यात आली. तणनाशकासोबत युरियाचा वापर थांबविण्याबाबत पत्रके वाटण्यात आली. सध्या भुईमूग आऱ्या फुटण्याच्या अवस्थेत, मूग शेंगा लागण्याच्या अवस्थेत, बाजरी व मका पोटरीत येण्याच्या अवस्थेत सोयाबीन, कपाशीवाढीच्या अवस्थेत असून, पीक परिस्थिती उत्तम आहे. काही ठिकाणी मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव जाणवत असून, त्यासाठी पक्षी थांबे लावणे, इमामेक्टिन फवारणे या उपाययोजनांसाठी प्रचार मोहीम हाती घेण्यात आली आहे. शेतीशाळा, कीड रोग सर्वेक्षण मोहीम, विकेल ते पिकेल अंतर्गत मका प्रात्यक्षिक याद्वारे उत्पादन वाढीसाठी प्रयत्न केले जात आहेत.
-----------------------
रासायनिक खतांचा अतिरिक्त वापर टाळण्याचे आवाहन
नांदगाव तालुक्याची २५ जुलैअखेर २१४ मिमी पावसाची सरासरी असताना ३६४ मिलीमीटर म्हणजेच १७० टक्के पर्जन्यवृष्टी झाली असून, ती जिल्ह्यात सर्वाधिक आहे. रासायनिक खतांमध्ये २० हजार मे. टन तालुक्यासाठी मंजूर झाले आहे. ४,७५० टन युरियाचा पुरवठा झाला आहे. नत्र, स्फुरद, पालाश या तीनही घटकांची पिकांना गरज असून, युरियाचा जास्त वापर केल्यास पिकांची वाढ जास्त होणे व फुले लागणे, दाणे भरणे यांच्यावर परिणाम होतो, तसेच कीड रोगाचे प्रमाण वाढते, म्हणून रासायनिक खतांचा संतुलित वापर करावा व नत्र खताचा अतिरिक्त वापर टाळावा, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.
----------------------------
तुती लागवड मोहीम
नावीन्यपूर्ण प्रकल्पांतर्गत रेशीम उद्योग वाढविण्यासाठी तुती लागवड मोहीम घेण्यात आली आहे. चैतन्य पाटील, अनिल हिरे, दत्तू शेलार, सतीश मढे, कृष्णा सूर्यवंशी या शेतकऱ्यांच्या पुढाकाराने आत्मा आणि कृषी विभाग, रेशीम विभागाच्या मदतीने म.गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून तुती लागवडीसाठी प्रयत्न करण्यात येत आहे. गोंडेगाव हे गाव तुरीचे गाव म्हणून ओळख निर्माण करीत आहे, या गावात गोरख जाधव यांनी कृषी विभागाच्या मदतीने एक एकर प्रात्यक्षिक राबवून तूर पीक लागवडीची प्रेरणा घेतली. गेल्या वर्षी ११ एकर क्षेत्रावर ९० क्विंटल तुरीचे उत्पादन घेतले. या हंगामात गोरख जाधव यांच्या मार्गदर्शनाने गोंडेगावातील ८० टक्के शेतकऱ्यांनी तुरीचे बीडीएन ७५१ वाणाचे सलग पीक घेतले आहे.
(२७ नांदगाव १)
270721\27nsk_7_27072021_13.jpg
२७ नांदगाव १