लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : गाव पातळीवर तलाठ्यांचे प्रत्येक शेतकऱ्याशी जवळचे नाते असल्याने त्याचा उपयोग समृद्धी महामार्गाच्या जमिनी खरेदीसाठी करून घेण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला असून, त्यासाठी शनिवारी शासकीय सुटीच्या दिवशी तातडीने सिन्नर व इगतपुरी तालुक्यातील तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन समृद्धी महामार्गात जागा जाणाऱ्या शेतकऱ्यांना पटविण्याची जबाबदारी टाकण्यात आली आहे. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी लागणाऱ्या जमिनींचे दर शुक्रवारी जिल्हा समितीने जाहीर केले असून, त्यात हेक्टरी ४० ते ८० लाखांपर्यंत वाढीव दर देण्यात आले आहेत. परंतु या महामार्गाला सुरुवातीपासून शेतकऱ्यांचा असलेला विरोध लक्षात घेता शेतकरी जागा देतील का? याविषयी प्रशासनालाच साशंकता वाटू लागली आहे. त्यामुळेच की काय दुसऱ्या शनिवारची शासकीय सुटी असतानाही जिल्हाधिकाऱ्यांनी सकाळी सिन्नर व इगतपुरीच्या तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांची तातडीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली. या बैठकीत समृद्धी महामार्ग ज्या गावातून जाणार आहे त्या गावातील तलाठ्यांना समृद्धी महामार्गाची माहिती देण्यात आली, तसेच या महामार्गासाठी कोणत्या गावातून किती हेक्टर तसेच कोणते गट जातील याबाबत अवगत करण्यात आले आहे. समितीने जमिनीचे दर जाहीर केल्यामुळे शेतकऱ्यांकडून प्रतिसाद मिळविण्यासाठी तलाठ्यांनी त्या त्या शेतकऱ्यांशी आपणहून संपर्क साधून त्यांना प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन करण्यात आले. समितीने जमिनीचे दर कसे ठरविले याबाबत तलाठ्यांना माहिती असायला हवी म्हणून या दर निश्चितीची पद्धती त्यांना समजावून सांगण्यात आली. बैठकीस उपजिल्हाधिकारी महेश पाटील, राहुल पाटील, विठ्ठल सोनवणे राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.
शेतकऱ्यांना पटविण्याचे काम तलाठ्यांकडे
By admin | Published: July 09, 2017 12:10 AM