यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मोठ्या प्रमाणावर रुग्ण कोरोनामुक्त होत आहेत परंतु काही रुग्णांना कोरोना उपचारानंतरच्या अनेक व्याधींचाही सामना करावा लागतो. त्यात प्रमुख्याने म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराने अनेक रुग्णांच्या आरोग्यावर परिणाम होतोय, त्यासाठी पोस्ट कोविड सेंटरवर कान, नाक, घसा तज्ज्ञांची नेमणूक करण्यात यावी. कोविड झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज दिल्यानंतर त्यांची नियमितपणे तपासणी करण्यात यावी. या आजाराचे गंभीर स्वरूप विचारात घेता याकरिता योग्य ती पूर्वतयारी करण्याच्या दृष्टीने तसेच टास्क फोर्स गठित करून यामध्ये जिल्हा रुग्णालय, मनपा रुग्णालय आणि खाजगी डॉक्टरांचाही समावेश करण्यात यावा असे बैठकीत ठरले.
शासनामार्फत महात्मा फुले जनआरोग्य योजनेत म्युकरमायकोसिस आजाराचा समावेश करण्यात आला असून जिल्हा रुग्णालय, मनपा रुग्णालय आणि खाजगी डॉक्टरांच्या एकत्रित मदतीने कामकाज करण्यात यावे. जनआरोग्य योजनेत कान, नाक व घसा यावर उपचार करणाऱ्या ज्या रुग्णालयांचा समावेश नाही त्यांचा तातडीने समावेश करण्यात यावा. तसेच खाजगी डॉक्टरांनी यामध्ये आपले योगदान द्यावे, असे आवाहनही या बैठकीत झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. या बैठकीस जिल्हाधिकारी सूरज मांढरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, कोरोना नोडल अधिकारी डॉ.आवेश पलोड, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रशांत खैरे, कान नाक घसा तज्ज्ञ डॉ.शब्बीर इंदोरवाला, डॉ.पुष्कर लेले, डॉ.प्रदीप गोंधळे आदी उपस्थित होते.
-----
टास्क फोर्स समिती
म्युकरमायकोसिसटास्क फोर्सची समिती गठित करण्यात आली असून, त्यात या विषयातील तज्ज्ञ डॉ.शब्बीर इंदोरवाला, डॉ. पुष्कर लेले, डॉ. प्रदीप गोंधळे, डॉ. शितल गुप्ता, डॉ. भरत त्रिवेदी, डॉ. संजय बापये, महानगरपालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, महानगरपालिकेचे नोडल ऑफिसर कोरोना व्यवस्थापन डॉ. आवेश पलोड इत्यादी सदस्य असून या समितीचे समन्वयक म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात काम पाहणार आहेत.