नाशिक : जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेट दोन टक्क्यांवर आल्याने नाशिक जिल्ह्याला निर्बंधातून दिलासा मिळावा याबाबत राज्य शासनाच्या टास्क फोर्सकडे प्रस्ताव पाठविण्यात आलेला आहे. निर्बंध शिथिलतेबाबत टास्फ फोर्सचा निर्णय अंतिम राहाणार असून त्यानुसारच कार्यवाही केली जाईल, असे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. येत्या दोन दिवसात याबाबतचे आदेश प्राप्त होण्याची शक्यता असल्याचेही ते म्हणाले.
शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्ह्यात सध्या तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू आहेत. तत्पूर्वी गेल्या दोन महिन्यांपासून निर्बंधाचे पालन केले जात आहे. जिल्ह्यातील कोरेानाची रुग्णसंख्या कमी होत असल्याने पॉझिटिव्हिटी रेट अवघा दोन टक्के इतका आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील निर्बंध काही प्रमाणात कमी करण्याबाबतची शिफारस जिल्हा प्रशासनाने पालकमंत्र्यांच्या आदेशाने शासनाला केलेली आहे. मुख्यमंत्र्यांच्या टास्क फोर्सकडे याबाबतचा प्रस्ताव पाठविण्यात आला असून याबाबत मुंबईत झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चादेखील झाल्याचे भुजबळ यांनी सांगितले.
मात्र याबाबचे अधिकृत आदेश जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले नसल्याने तूर्तास जिल्ह्यातील निर्बंध कायम राहाणार आहे. पुढील दोन दिवसात टास्क फोर्सकडून याबाबतचे आदेश प्राप्त होऊ शकतात असेही भुजबळ यांनी सांगितले. वीकेण्ड लॉकडाऊन आणि दुकानांच्या वेळेबाबत आपण केलेल्या शिफारशीनुसार सकारात्मक निर्णय जरी झाला असला तरी जिल्ह्यातील त्यावेळची परिस्थिती पाहून काही निर्बंध आपण कायम ठेवू शकतो अशी पुष्टीही त्यांनी जोडली.
---इन्फो---
धोका टळलेला नाही
निर्बंधात सूट देण्याबाबतचा निर्णय एका आदेशाने लागलीच होऊ शकतो मात्र पुन्हा निर्बंध लावणे कठीण असते असा पुनरुच्चार भुजबळ यांनी यावेळी केला. अमेरिका, ब्रिटन या सारख्या देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. केरळमध्ये गेल्या चोवीस तासात विक्रमी कोरेाना रुग्ण आढळल्याने दोन दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आलेला आहे. त्यामुळे धोका अजूनही टळलेला नाही. केंद्र सरकारनेदेखील काळजी घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत, असेही भुजबळ यांनी सांगितले.
--इन्फो--
पाणी कपातीचा निर्णय मनपाच घेईल
गंगापूर धरणातील पाणीसाठा वाढला असल्याने शहरात लागू करण्यात आलेला पाणी कपातीचा निर्णय महापालिका प्रशासनच घेईल असेही भुजबळ यांनी सांगितले. जिल्ह्यातील काही भागात पाऊस पडत असला तरी अनेक तालुक्यांमध्ये अजूनही समाधानकारक पाऊस नसल्याकडेही भुजबळ यांनी लक्ष वेधले.