मालेगाव शहर कामगारांचे शहर आहे. शहरात लाखो नागरिक चहाशौकीन आहेत. शहरात दिवसभरात आठ ते दहा कप चहा पिणारे आहेतही आहेत. तर दर तासाच्या अंतराने चहा पिणारे मजूर चहा टपरींवर दिसून येतात. येथे आजही चार-पाच रुपयांत चहाचा झुरका मिळतो. मागील काही महिन्यांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चहाचे मळे असलेल्या आसामसह इतर ठिकाणाहून चहा पावडर येऊ शकली नाही. चहाचे उत्पादन झाले; परंतु तोडणी न झाल्याने नुकसान झाले. त्याचाच परिणाम चहा पावडर शहरापर्यंत पोहोचली नाही म्हणून दरामध्ये वाढ झाली. एव्हाना दोनशे रुपये किलो या दराने मिळणारा चहा तीनशे साडेतीनशे रुपयांपर्यंत विक्री झाला तर प्रतवारीनुसार चहाचे दर निश्चित झाले आहे. नामांकित पॅकिंग चहा कंपन्यांचे दरही गगनाला भिडले आहेत. शहरात मोजके चार-पाच घाऊक चहा व्यापारी आहेत, तर किरकोळ विक्री करणारे शेकडो आहेत. शहरात एका नामांकित कंपनीची चहा पावडर महिन्यांकाठी ५० टन इतकी विक्री होते, तर इतर नामांकित चहा पावडर व शहरातील किरकोळ घाऊक अशी दोनशे टन चहा पावडर एकट्या मालेगाव शहरात महिन्याभरात हातोहात विकली जात असल्याचे एका विक्रेत्याने सांगितले. या चहा पावडर विक्रीमुळे शहरात दररोज कोट्यवधींची उलाढाल होत असल्याचे दिसून येते.
इन्फो
टपरीवरचा चहा महागला
शहरात कपभर चहा विक्रीच्या शेकडो हॉटेल्स्, टपऱ्या, दुकाने आहेत, तर कामगारवर्ग दिवसा व रात्रपाळीत थोड्या थोड्या अंतराने चहा घेतो. काही ठिकाणी ५ रुपये कट व १० रुपये फुल कप चहा, स्पेशल सुमारे १६ ते २० रुपयांपर्यंत विक्री होतो. चहा पावडरच्या दरवाढीमुळे टपरीवर मिळणारा चहा एक - दोन रुपयांनी महागला आहे. काही ठिकाणी दर स्थिर आहे. सध्या लॉकडाऊनमध्ये अंशत: शिथिलता मिळाली आहे. त्यामुळे दर काहीसे नियंत्रणात येतील असा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे. पूर्वीप्रमाणे चहा पावडरचे दर लवकर कमी होऊन सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळून त्यांचा दैनंदिन लागणारा चहाचा घोट गोड होण्याची शहरात प्रतीक्षा आहे.