नाशिक : जे येतील त्यांच्यासोबत नगरपालिका व महापालिकेची निवडणूक लढवा, ज्यांना पक्षातून जायचे त्यांनी उद्याऐवजी आजच जावे. किती नगरसेवक निवडून येतात यावरच पक्षाच्या कामकाजाचे यश ठरते, असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केले.दुपारी राष्ट्रवादी भवनात शहर कॉँग्रेसची बैठक झाली. त्यावेळी ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करीत होते. यावेळी व्यासपीठावर पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार हेमंत टकले, शहराध्यक्ष आमदार जयंत जाधव, प्रदेश चिटणीस अर्जुन टिळे, छबू नागरे, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, शरद कोशिरे, मनोहर बोराडे, रंजन ठाकरे, संजय खैरनार, महेश भामरे, नगरसेवक छाया ठाकरे, समाधान जाधव, राजेंद्र महाले, गटनेत्या कविता कर्डक, नीलिमा आमले, विक्रांत मते, संजय साबळे, शिवाजी चुंबळे, कल्पना चुंबळे, बाळासाहेब सोनवणे, बालम पटेल आदि उपस्थित होते. प्रास्ताविकात शहराध्यक्ष आमदार जयंत जाधव यांनी सांगितले की, भुजबळसाहेब तुरुंगात असल्याने बैठकीस उपस्थित राहताना दु:ख होत आहे. मात्र शरद पवार यांच्या सूचनेनुसार ‘शो मस्ट गो आॅन’ म्हणून निवडणुकांची तयारी व आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. शहर राष्ट्रवादी कॉँग्रेसने अनेक उपक्रम राबविले. आत्महत्त्याग्रस्त ५१ शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १५ हजारांची मदत केली. ज्येष्ठ नेते आमदार हेमंत टकले यांनी सांगितले की, महापालिकेतील नगरसेवकांची संख्या वाढवावी लागेल. तरच पक्षाचा महापौर होईल. पक्षाची स्थिती तसे पाहिले तर कठीण आहे. ज्यांना पक्ष सोडून जायचे आहे त्यांनी आजच पक्ष सोडून जावे. सिडको भागातील कसमादेच्या लोकांचे बळ घेऊन नगरसेवकांची संख्या वाढवावी, असे हेमंत टकले म्हणाले. (प्रतिनिधी)
तटकरे यांनी असंतुष्टांना खडसावले
By admin | Published: August 29, 2016 1:34 AM