लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : ‘सोनू तुझा मायावर भरवसा न्हाय काय?’ या गाण्याचे विडंबन करून भल्ल्या-भल्ल्यांची पोलखोल केली जात आहे. आता विधी शाखेच्या विद्यार्थ्यांनीही याचा आधार घेत महाविद्यालय अन् विद्यापीठाच्या गलथान कारभाराकडे लक्ष वेधले आहे. महाविद्यालयाच्या ऐन प्रवेशद्वारावर भले मोठे फलक लावून त्यावर ‘विद्यार्थी तुमचा एनबीटीवर भरवसा नाय काय... नाय काय?’ अशा ओळीत विद्यार्थ्यांनी निकालाविषयी भावना व्यक्त केल्या आहे. सध्या हे फलक कॉलेजरोड परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे. नुकताच बीएसएल एलएलबी, बीए एलएलबी आणि एलएलबी पदवीचे निकाल जाहीर करण्यात आले आहे; मात्र या निकालात प्रचंड गोंधळ आणि चुकांची शंभरी गाठलेली असल्याने बऱ्याच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती विद्यार्थी व्यक्त करीत आहेत. या शिक्षणक्रमांचे निकाल नुकतेच लागले. त्यावेळी तेव्हा बरेचसे विद्यार्थी मोजक्याच विषयात अनुत्तीर्ण असल्याची बाब समोर आली. त्यामुळे महाविद्यालयातील काही विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकेच्या झेरॉक्स विद्यापीठाकडून मागविल्या. जेव्हा या उत्तरपत्रिका विद्यार्थ्यांना मिळाल्या तेव्हा त्यामध्ये विद्यापीठाने केलेला कारभार उघड झाला. कारण गुणदान देताना ३५ ते ४० गुणांच्या बेरजेमध्येच घोळ केल्याचे समोर आले. बहुतांश विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेच्या मधल्या पानांवर विद्यार्थ्यांना ४० ते ४५ गुण दिले गेले; मात्र उत्तरपत्रिकेच्या मुखपृष्ठावर केवळ २५ गुण दिले. याचा परिणाम म्हणून बऱ्याच विद्यार्थ्यांना त्या विषयात अनुत्तीर्ण करण्यात आले आहे. याबाबत काही विद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडे तक्रार केली असून, विद्यापीठाने विद्यार्थ्यांना नेहमीच्या पठडीतील उत्तरे दिली आहेत. शिवाय आपण केलेल्या चुकांची कबुली दिली आहे; मात्र यावर तोडगा केव्हा निघेल याबाबत मात्र साशंकता असल्याने विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. त्याचबरोबर विद्यापीठाने केलेल्या चुका दुरुस्त न केल्यास याबाबतचे विद्यार्थ्यांकडून तीव्र आंदोलन छेडले जाण्याचीही शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर या गलथान कारभाराकडे लक्ष वेधण्यासाठी अशा उपरोधीक फलकाचा आधार घेतला आहे. बहुचर्चित ‘सोनू’गीताच्या बोलातून महाविद्यालय प्रशासन आणि विद्यापीठावर निशाणा साधला आहे. बुधवारी सकाळी महाविद्यालयाच्या समोरील दर्शनीभागात हा फलक लागला तेव्हा विद्यार्थ्यांचे लक्ष वेधले गेले आणि कॉलेजरोड परिसरात हा चर्चेचा विषय ठरला. आता एनबीटी विद्यार्थ्यांचा भरवसा किती टिकवते याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागून आहे.
तुमचा एनबीटीवर भरवसा नाय काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 12:14 AM