त्र्यंबकेश्वर : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने त्र्यंबकेश्वर येथे नागा संन्यासी यांचे सात आखाडे आहेत, तर उदासीन बडा उदासीन नया आणि निर्मल आखाडा असे दहा आखाडे असून, त्र्यंबकेश्वर हे नाथ संप्रदायाचे प्रमुख ठिकाण असल्याने येथे गोरक्षनाथ मठदेखील आहे. या सर्व आखाड्यांच्या इमारतींना या वर्षींच्या चतुर्थ वार्षिक रिव्हिजनमध्ये कर निर्धारणा लागू केली आहे.गावात नगरपालिकेच्या विरोधात आधीच करण्यात आलेल्या वाढीव घरपट्टीमुळे आधीच गावात संतापाचे वातावरण पसरलेले आहे. आता शहरातील साधू आखाडे यांच्या इमारतीचे मोजमाप करण्यात आल्याने आणि केलेल्या घरपट्टी वाढीने प्रत्येक आखाड्यात किमान दोन ते तीन, तर आखाड्याच्या विस्तारानुसार असलेल्या ४-५ साधू व्यतिरिक्त येथे कोणी राहत नाही. बहुतेक आखाड्यात सिंहस्थ कालावधीत येणाऱ्या साधू-महंतांसाठी राहण्यासाठी महाराष्ट्र शासनानेच शेड्स पक्की बांधकामे बांधून दिली आहेत.
त्या इमारतीत काही आखाड्यांनी मात्र कमर्शियल वापर सुरू केला आहे. जसे निरंजनीसारखे काही आखाड्यांनी स्वतःच्या खर्चाने बांधकाम करून त्याचा लॉजिंग मंगल कार्यालयसारखा वापर सुरू केला आहे. अशा ठिकाणी करमूल्य निर्धारणाचा वापर करून पालिकेने घरपट्टी लावणे योग्य आहे. पण सर्वच आखाड्यांना एकाच मापात सारखे तोलणे योग्य वाटत नाही.
यासंदर्भात त्र्यंबकेश्वर येथे आलेले जुना आखाड्याचे संरक्षक महंत तथा अखिल भारतीय आखाडा परिषदेचे आंतरराष्ट्रीय महंत हरिगिरी महाराज यांनी तीव्र नाराजी व्यक्त करून हम तो आखाडे का व्यावसायिक इस्तेमाल नही करते. आजतक नगरपालिकावालोने कोई टॅक्स लागू नही किया, तो फिर अभी कौनसा टॅक्स लागू किया है हम तो कौनसा टॅक्स भरनेवाले नही है, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. ते पुढे म्हणाले, एकतर सिंहस्थ कुंभमेळा संपल्यानंतर नगर परिषद किंवा गाववाले आखाड्याकडे पाहत नाही. येथे कोणी राहतात की नाही पालिकेच्या खिजगणतीत नसते. येथील स्वच्छता रस्ते पाणी वीज आदी मूलभूत सुविधा योग्य आहेत की नाही याकडे पाहिले जात नाही. अचानक घरपट्टी तिही लाखोंच्या पटीत वाढवायचे कारणच काय ? आम्ही साधू-संन्यासी हिंदू धर्म प्रसाराचे काम करीत आहोत. प्रशासन सिंहस्थात तर आमच्याकडे वारंवार चकरा मारीत असते. आमच्यामुळेच गावातील विकास कामे होतात.विशेष म्हणजे त्र्यंबकेश्वर शहराची पाणीपुरवठा योजनेची पाण्याची टाकी उंचावर असणे गरजेचे होती त्या टाकीला जागा जुना आखाड्याने विनामूल्य दिली, त्याच टाकीने गावात पाणीपुरवठा होत आहे. त्याचा आम्ही एक रुपया घेतला नाही आणि आम्हाला पट्टी लावायला निघाले, असे म्हणत महाराज संतप्त झाले.गावात अनेक आखाड्यांनी आपल्या मालमत्तेचा वापर व्यावसायिकरीतीने सुरू केला आहे. त्यांना घरपट्टी लावणे इष्ट आहे. पण जिथे व्यावसायिक वापर नाही त्यांना जुजबी स्वरूपात घरपट्टी लावणे योग्य आहे. मात्र संपूर्ण त्र्यंबकेश्वर शहराबाहेर साधू आखाड्यांना नागरी सुविधादेखील मिळणे गरजेचे आहे, असे काहींनी सांगितले.