-----------------
मराठा क्रांती मोर्चाचे कृषिमंत्र्यांना साकडे
मालेगाव : मराठा आरक्षणासह नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या मराठा उमेदवारांना नोकरीत सामावून घ्यावे, या मागणीचे निवेदन मराठा क्रांती मोर्चा व मराठा समाजातर्फे कृषिमंत्री दादा भुसे यांना सादर करण्यात आले. संपर्क कार्यालयात उपजिल्हाप्रमुख प्रमोद शुक्ला यांनी निवेदन स्वीकारले. शिष्टमंडळात मराठा महासंघाचे हरी निकम, आर. के. बच्छाव, देवा पाटील, अनिल पाटील, गिरीश बोरसे, विजय शेवाळे, भरत पाटील, जितेंद्र देसले यांचा समावेश होता.
--------
कंत्राटी शिक्षकेतर कर्मचारी भरतीचा निर्णय रद्द करा
मालेगाव : राज्यातील विविध शैक्षणिक संस्था व शाळांमध्ये कंत्राटी पद्धतीने शिक्षकेतर कर्मचारी भरतीचा निर्णय रद्द करावा, अशी मागणी शिक्षक भारतीतर्फे अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी राशीद पठाण, चंद्रशेखर शेलार, रईस शेख, विजय येवले, नितीन हिरे, अंजूम पठाण व पदाधिकारी उपस्थित होते.
-------
सोयगाव परिसरात वाढत्या चोऱ्या
मालेगाव : सोयगाव परिसरात मोठ्या प्रमाणात चोऱ्या वाढल्या असून, चोरट्यांकडून दुचाकीसह चेन स्नॅचिंगचे प्रकार वाढले आहे. पोलिसांनी या भागात रात्रीची गस्त वाढवून चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
-------
मालेगावी किसान सभेची निदर्शने
मालेगाव : नवीन तीन कृषी कायदे केंद्र सरकारने रद्द करावेत या मागणीसाठी सोमवारी तहसील कचेरीसमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी शेतकऱ्यांनी देशव्यापी संपास पाठिंबा दर्शविला. तहसीलदार चंद्रजित राजपूत यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी कॉ. शफीक अहमद यांचे भाषण झाले. किसान सभेचे तालुका सचिव राजाराम अहिरे, उत्तम निकम, गटलू चौधरी, देवचंद सोनवणे, दादाजी वाकळे आदी उपस्थित होते.
------
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी
मालेगाव : तालुक्यात ९९ ग्रामपंचायतींच्या नवीन वर्षात निवडणुका होणार असून, इच्छुक उमेदवारांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. काही ग्रामपंचायतींमध्ये बिनविरोध निवडणुकीसाठी प्रयत्न सुरू असून, काही ग्रामपंचायतींमध्ये मात्र निवडणुका रंगण्याची शक्यता आहे. तालुक्यातील सुमारे २५ गावांमधील मतदार ऊसतोडणीसाठी बाहेरगावी गेल्याने त्यांना आणण्यासाठी उमेदवारांना कसरत करावी लागणार आहे.
-------
बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाईची मागणी
मालेगाव : शहरातील बेशिस्त रिक्षाचालकांमुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याच्या मधोमध रिक्षा थांबवून प्रवासी घेण्याचा प्रकार वाढला आहे. रिक्षाथांबे असताना चालक कुठेही रिक्षा थांबवतात. यामुळे वाहतुकीचा खोळंबा होत आहे. रिक्षाचालकांवर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.
--------
मनमाड चौफुलीवरील रस्त्यांच्या दुरुस्तीची मागणी
मालेगाव : शहरालगतच्या मनमाड चौफुलीवरील सर्व्हिस रोड व मुख्य रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना कसरत करीत वाहने हाकावी लागत आहे. या चौफुलीवरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी केली जात आहे.