नाशिक : गेल्या दोन वर्षांपासून गाजत असलेल्या सप्तशृंग देवीच्या दर्शनाला येणाऱ्या खासगी चारचाकीतील भक्तांना अखेर प्रतिमाणसी दोन रुपये कर लावण्याचा ठराव जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती बैठकीत संमत करण्यात आला. मात्र या करातून पायी येणाऱ्या, बसमधून येणाऱ्या आणि अपंगांना तसेच बालकांना सूट देण्याबाबतही बैठकीत एकमत झाले.दरम्यान, या सप्तशृंग देवी गडावरील भाविकांवर कर आकारणी करण्याच्या मुद्द्यावर राष्ट्रवादीचे गटनेते रवींद्र देवरे यांनी सभा रोखून धरत थेट न्यायालयात जाण्याचा इशारा दिला. त्याला सर्वपक्षीय सदस्यांचे समर्थन मिळाल्याने सभा एक तास तहकूब करण्याची नामुष्की ओढविली. अखेर तासाभराच्या चर्चेनंतर खासगी चारचाकीतून येणाऱ्या भाविकांनाच कर लावण्यावर एकमत झाल्याने बैठक पूर्ववत सुरू झाली.
रवींद्र देवरे यांनी मागील स्थायी समितीच्या बैठकीत सप्तशृंग देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांबाबत तसेच चारचाकी वाहनांबाबत कर आकारणीचा निर्णय झाला. याबाबत कारवाई का झाली नाही, अशी विचारणा केली. त्यावर अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांनी प्रस्ताव पाठवा, तत्काळ निर्णय घेऊ, असे सांगितल्याने संताप अनावर झालेल्या रवींद्र देवरे यांनी करून घेऊ, पाहून घेऊ, हे किती दिवस चालणार. जोपर्यंत यावर निर्णय होत नाही, तोपर्यंत पुढील सभा चालू देणार नाही, असा इशारा दिला. तसेच सभा तहकुबीची सूचना केली. त्यावर विजयश्री चुंबळे यांनी तुम्ही असे करू नका, जिल्ह्णात अतिवृष्टीने नुकसान झाले आहे, त्याबाबत चर्चा होणे गरजेचे आहे, असे सांगितले. मात्र सर्व सदस्य सभागृहाबाहेर निघून गेले. त्यानंतरही सभा सुरूच असल्याने पुन्हा सभागृहात येऊन रवींद्र देवरे यांनी सभा चालविली तर न्यायालयात जाऊ, असा इशारा दिल्याने तासाभरासाठी सभा तहकूब करण्याचे आदेश विजयश्री चुंबळे यांनी दिले. त्यानंतर तासाभरात नेमका कर कसा आणि कोणाला लावायचा यावर एकमत झाल्यानंतर सभा सुरू झाली. (प्रतिनिधी)