लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : घरपट्टी व पाणीपट्टीत दरवाढ करण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने पुन्हा एकदा स्थायी समितीवर ठेवला असला तरी स्थायीने मात्र प्रस्ताव दुरुस्तीसाठी प्रशासनाला परत पाठविला आहे. त्यामुळे दरवाढीचा प्रस्ताव पुन्हा एकदा लांबणीवर पडला आहे.मागील पंचवार्षिक काळात स्थायी समितीचे सभापती सलीम शेख यांच्या कारकिर्दीत घरपट्टीत १४ टक्के, तर पाणीपट्टीत ५ टक्के करवाढीचा प्रस्ताव फेटाळून लावण्यात आला होता. स्थायीने एखादा प्रस्ताव फेटाळल्यानंतर तो तीन महिन्यांपर्यंत पुन्हा मांडला जात नाही. दरम्यान, तीन महिन्यांहून अधिक कालावधी लोटल्यानंतर प्रशासनाने पुन्हा एकदा यापूर्वीचाच दरवाढीचा प्रस्ताव स्थायी समितीवर मान्यतेसाठी पाठविला आहे. तत्पूर्वी, स्थायी समितीचे सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी मागील आठवड्यात सन २०१७-१८ या वर्षाचे अंदाजपत्रक सादर करताना घरपट्टी व पाणीपट्टीत कोणतीही वाढ केली नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे, प्रशासनाने स्थायी समितीवर करवाढीचा प्रस्ताव मान्यतेसाठी पाठविला असला तरी त्याची अंमलबजावणी यावर्षी होऊ शकणार नाही. प्रशासनाकडून स्थायीची मान्यता घेऊन ठेवली जाणार असतानाच स्थायी समिती सभापतींनी मात्र, सदरचा प्रस्ताव हा पुन्हा नव्याने दुरुस्त करत स्थायीवर पाठविण्याचे आदेशित केले आहे.
करवाढीचा प्रस्ताव स्थायीकडून माघारी
By admin | Published: June 03, 2017 1:19 AM