देवळाली शिवारातील सर्व्हे क्रमांक २९५/१मधील आरक्षित जागेच्या भूसंपादनापोटी १०० कोटींचा टीडीआर घोटाळ्याची चौकशी करण्याचे अनेक ठराव झाले आहेत. बुधवारी (दि.९) या घोटाळ्याची विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या समोर हेाणारी चौकशी टळली. त्यातच महापालिकेत प्राथमिक चौकशी झाल्यानंतर आता अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे यांना चौकशीचे आदेश देण्यात आले हेाते; मात्र आता या घोटाळ्यात सबळ पुरावे ठरत असलेली नोटिसीची फाईल सलग दुसऱ्यांदा गहाळ झाली आहे. यापूर्वी प्रशासन उपायुक्त मनोज घोडे-पाटील यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी
अंतिम टप्प्यात असतानाच नोटिसीची फाईल गहाळ झाली होती. शिवसेनेच्या इशाऱ्यानंतर फाईल परत आली.
दरम्यान, आयुक्त कैलास जाधव यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली दुसरी चौकशी समिती गठीत असताना नोटिसीची फाइल पुन्हा गहाळ झाली आहे. त्यामुळे अशाप्रकारे फाईल न सांभाळू शकणाऱ्यांवर आयुक्तांनी फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.