नाशिक : वर्ग-३ आणि ४ च्या शिक्षकांची बदली करताना पालिकाबाह्य शिक्षकांचा त्यात समावेश करू नये, तसेच शिक्षकांची बदली करताना महासभेच्या मान्यतेशिवाय त्यास मूर्त स्वरूप देऊ नये असे आदेश असताना ते धाब्यावर बसवून महापालिकेत १९९९ ते २०१३ या कालावधीत शेकडो शिक्षकांच्या बेकायदेशीर बदल्या झाल्याचा गंभीर प्रकार माकपाचे गटनेते तानाजी जायभावे यांनी उघडकीस आणला आहे. या प्रकरणी तत्कालीन शिक्षण मंडळ प्रशासनाधिकारी वसुधा कुरणावळ यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. कुरणावळ यांच्या कारकीर्दीत सन २०१३ पर्यंत अशा सुमारे २५० शिक्षकांच्या बदल्या झाल्या असून, त्या करताना शासकीय आदेश धाब्यावर बसविण्यात आल्याचा आरोप होतो आहे. यासंदर्भात राज्य शासनाच्या अध्यादेशानुसार जिल्हा परिषदेतील वर्ग-३ व ४ च्या कर्मचाऱ्यांची इतर शासनमान्य संस्थांमध्ये बदली करण्यात येऊ नये असे स्पष्ट निर्देश असताना ते धाब्यावर बसविण्यात आले. जिल्हा परिषदेतील अनेक शिक्षकांना महापालिकेच्या सेवेत सामावून घेण्यात आले. असे करताना तत्कालीन शिक्षण मंडळ प्रशासनाधिकारी डॉ. वसुधा कुरणावळ यांनी महासभेला तर अंधारात ठेवलेच दुसरीकडे आयुक्तांची मान्यता घेणाऱ्या पत्रकात वारंवार खाडाखोड करून आयुक्तांचीही दिशाभूल केल्याचा आरोप जायभावे यांनी केला आहे. यासंदर्भात नोव्हेंबर १३ या महिन्यात आयुक्तांकडे सादर केलेल्या पती-पत्नी एकत्रीकरण यादीत समावेश केलेल्या शिक्षकांच्या यादीत अनेक नावे घुसविण्यासाठी वारंवार खाडाखोड केल्याचे दिसत असून, त्याद्वारे आर्थिक गैरव्यवहार करण्याचा कुरणावळ यांचा प्रयत्न असल्याचा आरोपही जायभावे यांनी केला आहे. (प्रतिनिधी)
पालिकेत शिक्षक समायोजन घोटाळा
By admin | Published: June 14, 2014 1:36 AM