नाशिक : शिक्षक पात्रता परीक्षा २०१९ - २०२० मधील घोटाळ्यात नाशिक विभागातून १ हजार ७७० अपात्रांना पात्र करण्यात आल्याचे पुणे सायबर पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. या प्रकरणात पुणे सायबर पोलिसांनी मालेगाव येथून मुकुंद सूर्यवंशी या शिक्षकाला अटक केल्यानंतर यातील बहुतांश प्रकरणे ही कसमादे पट्ट्यातून समोर येण्याची शक्यता निर्माण झाली असून वेगवेगळ्या संघटनांमध्ये कार्यरत त्याच्या साथीदारांचे दाबे दणाणले आहे. विशेष म्हणजे मुकुंद सूर्यवंशी याला १८ फेब्रुवारीलाच निलंबित करण्यात आले आहे. असे असतानाही जिल्ह्यातील टीईटी प्रमाणपत्रांच्या पडताळणीविषयीची माहिती शिक्षण विभागाकडूनही दडविण्याचा प्रकार सुरू असल्याने या प्रकणात एजंटचे मोठे जाळे असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
टीईटी घोटाळ्यात जी.ए. सॉप्टवेअरचा प्रितेश देशमुख याने राज्यभरातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील म्होरक्यांसोबत संगनमत करून सुमारे ७ हजार ८८० अपात्र परीक्षार्थीकडून पैसे घेऊन त्यांना पात्रतेचे प्रमाणपत्र मिळवून दिले असल्याचे पुणे सायबर पोलिसांच्या तपासात समोर आले होते. या तपासात पोलिसांनी चाळीसगावच्या एका शिक्षकाला व त्याचा साथीदार आश्रमशाळेचा कारकून असे दोघांना काही दिवसांपूर्वी अटक केली होती. त्याच्या तपासातून या प्रकरणाचे आणखी धागे दोरे पोलिसांच्या हाती आले असून त्यांचा मुकुंद सूर्यवंशीलाही पोलिसांनी मालेगावातून अटक केली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात आतापर्यंत अटक करण्यात आलेले सर्व संशयित हे त्यांचा मूळ पत्ता बदलून राहत असल्याचे समोर आले आहे. यातील स्वप्नील पाटील याला नाशिकमधून अटक करण्यात आली आहे. तो मूळचा चाळीसगाव येथील आहे. तर मुकुंद सूर्यवंशी हा नांदगाव येथील असून तो सध्या मालेगाव येथे राहात असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. दरम्यान, या प्रकरणात तपास यंत्रणांनी कसमादे पट्ट्यावर लक्ष केंद्रित करतानाच संशयितांच्या माध्यमातून धुळे आणि जळगावकडेमध्येही या प्रकरणातील धागे दोरे शोधण्यास सुरुवात केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.