नाशिक : शैक्षणिक वर्ष सुरू होऊन अडीच महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतर शिक्षण विभागाने शुल्क निश्चिती, दप्तराचे ओझे आणि पंचवीस टक्के प्रवेशाबाबत मार्गदर्शन करण्यासाठी बोलाविलेल्या सभेत शिक्षकांनीच शिक्षणाधिकाºयांचा वर्ग घेतला. मुख्याध्यापकांकडून प्रश्नांचा भडिमार सुरू झाल्याने शिक्षणाधिकाºयांनी सभेतून निघून जाणे पसंत केले.शिक्षण विभागाच्या वतीने रावसाहेब थोरात सभागृहात खासगी प्राथमिक अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित आणि स्वयं अर्थसहाय्यीत सर्व माध्यमांच्या खासगी प्राथमिक शाळांची सहविचार सभा आयोजित करण्यात आली होती. शिक्षणाधिकारी राजीव म्हस्कर आणि इतर अधिकारी उपस्थित होते. म्हस्कर यांनी मार्गदर्शन करण्यास सुरुवात केल्यानंतर सभागृहातील अनेक शिक्षक, मुख्याध्यापकांनी प्रवेशापूर्वीचे मार्गदर्शन दोन महिन्यांनंतर का दिले जात आहे. याविषयी विचारणा केली तर प्राथमिक शिक्षक महासंघाचे नंदलाल धांडे यांनी शिक्षणाधिकाºयांवर प्रश्नांची सरबत्ती केली. शिक्षण खात्याने ऐनवेळी दिवसभरासाठी आयोजित केलेल्या सहविचार सभेमुळे मुख्याध्यापकांच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम झाल्याची बाब शिक्षणाधिकाºयांच्या निदर्शनास आणून दिली. शिक्षणसंस्था आणि शिक्षकांचे अनेक प्रश्न असताना केवळ मार्गदर्शनाने काय होणार, असा सवालही धांडे यांनी उपस्थित केला. २५ टक्के प्रवेशाचे मागील अनुदान शाळांना अद्याप मिळालेले नाही त्याबाबत शिक्षण खात्याने मार्गदर्शन करावे, अशी मागणी त्यांनी केली. त्याचबरोबर वेतनेतर अनुदान मार्चपासून जिल्हा परिषदेकडे वर्ग होऊनही त्याचे वाटप अद्याप का झाले नाही, भविष्य निर्वाह निधीच्या स्लिपा मिळत नसल्याकडेही शिक्षणाधिकाºयांचे लक्ष वेधून शालेय पोषणाच्या थकीत अनुदानाबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. शिक्षकांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न प्रलंबित असताना केवळ शासकीय परिपत्रकाचे पालन करण्याबाबत सहविचार सभा होत असेल तर यातून काहीच निष्पन्न होणार नसल्याचे सभागृहातील अनेक शिक्षकांनी यावेळी सांगितले. त्यानंतर काही वेळाने शिक्षणाधिकारी सभेतून निघून गेल्याचे मुख्याध्यापकांनी सांगितले. दरम्यान, शिक्षण विस्तार अधिकारी प्रमोद चिंचोले, धनंजय कोळी आणि विजय पगार यांनी २५ टक्के प्रवेश, शुल्क नियमन, संच मान्यता, अप्रशिक्षित शिक्षक प्रशिक्षण, आरटी प्रवेश निकष पूर्तता, आधार कार्ड नोंदणी, पोषण आहार, परिवहन समिती आदिंविषयी प्रोजेक्टरच्या सहाय्याने मार्गदर्शन करीत शिक्षकांच्या शंकांचे निरसन केले.
शिक्षकांकडून प्रश्नांचा भडिमार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2017 1:14 AM