नाशिक : शिक्षकांच्या अनेक प्रश्नांबाबत मुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्यांशी एकाच बैठकीत चर्चा करून लवकरच नवे धोरण ठरवले जाईल, अशी ग्वाही राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. प्राथमिक शिक्षक गैरव्यवहार करीत नसल्याने त्यांच्या बदल्या अनावश्यक असल्याचे मतही त्यांनी यावेळी मांडले. महाकवी कालिदास कलामंदिरात कै. भा. वा. शिंपी प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित शिक्षक समिती भूषण पुरस्कार वितरण समारंभ व राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या शिक्षक चेतना मेळाव्यात त्या प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या. त्या म्हणाल्या, जिल्हा परिषद प्राथमिक शाळांचा दर्जा दिवसेंदिवस खालावत असताना, नुसत्या शिक्षकांच्या संघटना उभारून उपयोग होणार नाही. जिल्हा परिषद शाळांचा दर्जा उंचावल्यास शिक्षकांचा दर्जा सुधारेल. ‘एमएस सीआयटी’साठी मुदतवाढ, बदल्या, अशैक्षणिक कामांचा बोजा असे शिक्षकांचे अनेक प्रश्न असून, याबाबत मुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्यांना लिखित पत्र देऊन एकाच बैठकीत त्यावर निर्णय घेण्याची विनंती करणार आहोत. प्राथमिक शिक्षक हे काही इतर सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे गैरव्यवहार करीत नाहीत. मग त्यांची दर तीन वर्षांनी बदली करण्याची गरज आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. शिक्षकांच्या प्रश्नांवर गांभीर्याने विचार करून धोरणात बदल केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी मुंडे यांच्या हस्ते पुरस्कारप्राप्त शिक्षक, पदाधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला. व्यासपीठावर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष विजयश्री चुंबळे, मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर, माजी अध्यक्ष पंढरीनाथ थोरे, राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे अध्यक्ष काळू बोरसे-पाटील, भाजपाचे शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी, स्मिता नागरगोजे, कलावती शिंपी, अलका अहिरे, भारती बागुल, सुजाता करजगीकर उपस्थित होते. तत्पूर्वी, विश्वनाथ मिरजकर, काळू बोरसे-पाटील यांनी शिक्षकांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले. ‘एमएस सीआयटी’च्या सक्तीला डिसेंबरपर्यंत मुदतवाढ द्यावी, प्राथमिक शाळांना सुविधा पुरवाव्यात, शासन पातळीवरून मुख्यालयाची अट रद्द करावी, शिक्षकांवरील अशैक्षणिक कामांचा बोजा कमी करावा, बदल्यांचा प्रश्न सोडवावा आदि मागण्या मांडण्यात आल्या. लक्ष्मण सावजी यांनी मनोगत व्यक्त केले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष उमेश शिंपी यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमास राज्यातील प्राथमिक शिक्षक व त्यांचे कुटुंब उपस्थित होते. (प्रतिनिधी)
शिक्षक समिती भूषण पुरस्कार वितरण समारंभ
By admin | Published: February 09, 2015 1:56 AM