सिडको इंदिरानगर बोगद्याकडून गोविंदनगर रस्त्याने आरडी सर्कलकडे सुसाट जाणाऱ्या मोटारीने रविवारी (दि. १६) दुपारी जॉगिंग गायत्री ठाकूर ट्रॅकजवळ पादचाऱ्यांना उडवले. तसेच खाद्यपदार्थ विक्रीच्या वाहनांनाही धडक दिली. यावेळी उसाचा रस पिण्यासाठी थांबलेल्या शिक्षिका गायत्री संदीप ठाकूर (३८, रा. इंदिरानगर) या गंभीर जखमी झाल्याने मृत्युमुखी पडल्या. त्यांच्यासोबत असलेल्या आणखी एक महिला व एक विक्रेताही जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. कारचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पंचवटी भागातील रहिवासी असलेला युवक संशयित सौरभ सुनील भोपे त्याच्या कारमधून (एमएच १४ जेई ०९००) मैत्रिणीला घेऊन मुंबईहून नाशिकला आला होता. रविवारी दुपारी पावणेतीन वाजेच्या गोविंदनगरहून वेगाने जात होता. यावेळी मोबाइल बघताना त्याचे कारवरील नियंत्रण सुटले अन् कार थेट रस्त्यालगत उभ्या असलेल्या विविध खाद्यपदार्थ विक्रीच्या वाहनांना धडकून घसरत पुढे गेली. यावेळी उसाच्या गुन्हाळाजवळ आपल्या मैत्रिणीसोबत थांबलेल्या ठाकूर या त्याकारच्या चाकाखाली सापडल्या. दोघी मैत्रिणींना धडक बसली. गुऱ्हाळ विक्रेत्याने धाव घेतल्याने तो बालंबाल बचावला. अचानकपणे झालेल्या या अपघाताने परिसरात गोंधळ उडाला. काही वेळेतच या रस्त्यावर वाहतूककोंडी निर्माण झाली. जखर्मीना त्वरित जवळच्या खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. यावेळी उपचार सुरू असताना ठाकूर यांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच मुंबईनाका पोलिसांनी धाव घेत चालकाला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध मुंबई नाका पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
वाढत्या अतिक्रमणाविषयी रोषगोविंदनगर रस्त्याला दुतर्फा विविध खाद्यपदार्थ विक्रेत्यांसह फळ विक्रेत्यांचा विळखा पडला आहे. दिवसेंदिवस या रस्त्यावर अतिक्रमण फोफावत चालले आहे. दुचाकी, तीनचाकी, चारचाकी वाहनांमधून विक्रेते व्यवसाय करत आहेत. परिणामी वाहतुकीलाही अडथळा निर्माण होत असून महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या 'अर्थ'पूर्ण आशीर्वादाने हे अतिक्रमण वाढीस लागत असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. संपूर्ण दिवसभर तसेच रात्रीसुद्धा या रस्त्याला खाऊगल्लीचे स्वरूप आलेले असते. यामुळे अनेकदा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नही या ठिकाणी निर्माण होतो.