नाशिक : महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या माध्यमिक शाळांमधील रिक्त असलेली शिक्षकांची २१ पदे भरण्याची प्रक्रिया येत्या आठ-दहा दिवसांत राबविण्यात येणार असून, खासगी एजन्सीमार्फत इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार असल्याची माहिती शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी नितीन उपासनी यांनी दिली. महापालिकेच्या शिक्षण विभागामार्फत १३ माध्यमिक शाळा चालविल्या जातात. या माध्यमिक शाळांमध्ये सध्या ५३ शिक्षक कार्यरत असून, २१ शिक्षकांची पदे रिक्त आहेत. सदर पदे भरण्यास महासभेने मान्यता दिल्यानंतर इच्छुक पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार, २१ पदांसाठी ९७६ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. सदर प्राप्त अर्जांमधून पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे. सदर मुलाखती या मनपा शिक्षण विभागामार्फत न घेता त्यासाठी खासगी एजन्सी नेमण्याचा प्रस्ताव आयुक्तांकडे मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे. सदर मुलाखती घेण्यासाठी खासगी एजन्सी नेमण्याकरिता निविदा मागविल्या होत्या. त्यात पाच एजन्सीने प्रतिसाद दिला आहे. एजन्सी मान्यतेनंतर प्रत्यक्ष मुलाखतींचा कार्यक्रम राबविला जाणार आहे. याशिवाय, महापालिकेच्या उर्दू माध्यमांच्या शाळांमधील ३४ शिक्षकांची पदे रिक्त आहेत. सदर पदे भरण्याकरिताही लवकरच जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. माध्यमिक व उर्दू माध्यमातील शिक्षकांच्या या भरती प्रक्रियेमुळे रिक्त असणाºया पदांचा प्रश्न मिटणार आहे.प्राथमिकमध्येही पदे रिक्त महापालिकेच्या १२९ प्राथमिक शाळा आहेत. सुमारे ९५० शिक्षक असून, १०४ शिक्षकांची पदे रिक्त आहेत. सदर पदे भरण्यासाठी मात्र शासनाचीच परवानगी लागणार आहे. तूर्त प्राथमिक शाळांसाठी शिक्षकांची गरज नसल्याचे सांगितले जाते.
मनपा माध्यमिक शाळांमध्ये शिक्षक भरतीची प्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2017 12:36 AM