राज्यात कोरोनाचा हाहाकार असताना नाशिक जिल्ह्यात सुद्धा शाळा बंद ठेवण्यात आल्या. मात्र, शाळा जरी बंद असल्या तरी ‘शाळा बंद शिक्षण सुरू’ या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील सर्व शाळांना शिक्षकांमार्फत ऑनलाइन शिक्षण देण्याचे कार्य चालूच होते. हे शिक्षण देत असताना निर्माण होणाऱ्या अडचणी व योग्य ते मार्गदर्शन होण्यासाठी शिक्षण परिषद होणे गरजेचे होते. नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य रत्नप्रभा भालेराव, शिक्षणाधिकारी राजीव म्हसकर, तत्कालीन प्राचार्य डॉ. वैशाली वीर, जालिंदर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण परिषद ऑनलाइन घेण्याचे विद्या प्राधिकरण यांच्याकडून नियोजन करण्यात आले होते. शैक्षणिक क्षेत्रात शिक्षकांना निर्माण होणाऱ्या दैनंदिन अडचणी, शालेय अभ्यासक्रम, पाठ्यक्रमात होणाऱ्या बदलांचे योग्य मार्गदर्शन तसेच कोरोनामुळे निर्माण झालेली ऑनलाइन शिक्षणाची स्थिती व साधनांचा वापर यासाठी मागील वर्षी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातील एक दिवस शिक्षकांसाठी ऑनलाइन शिक्षण परिषद आयोजित करून केंद्रातील तज्ज्ञ व्यक्तींच्या साहाय्याने व वरिष्ठ पातळीवरून मिळणाऱ्या मार्गदर्शक सूचनांच्या आधारे समस्या सोडविल्या जात होत्या. त्यामुळे सदर शिक्षण परिषद उपक्रम यशस्वी होऊ शकला.
कोट...
सध्या केंद्रप्रमुखांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने एका केंद्रप्रमुखाकडे अनेक केंद्रांचा चार्ज आहेत. यातच प्रत्येक केंद्रात होणाऱ्या शिक्षण परिषदेला उपस्थिती दर्शविताना मोठी अडचण निर्माण झाली होती. मात्र, मागील वर्षी ऑनलाइन शिक्षण परिषद झाल्याने प्रत्येक केंद्रातील शिक्षण परिषदेला हजर राहून मार्गदर्शन करता आले.
- दिलीप जावरे, केंद्रप्रमुख, मालेगाव.