नाशिक : प्रत्येक शिक्षकाने आपल्या विषयात निष्णात असतानाच उत्तम वक्तृत्व, विषयाशी निगडीत छोट्या मनोरंजनात्मक गोष्टी सांगून हसत खेळत शिक्षण देतानाच स्वत: अपडेट राहून तेच अद्ययावत ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन माजी आयएएस अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी केले. कोरोना काळात अभिनव पद्धतीने ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या १८ शिक्षकांचा रोटरी क्लब, नाशिकतर्फे सन्मान केल्यानंतरच्या सोहळ्यात ते बोलत होते.
रोटरी क्लब, नाशिकतर्फे दरवर्षी नेशन बिल्डर अवॉर्ड कर्तबगार शिक्षकांना प्रदान केले जातात. यंदाचे हे पुरस्कार अविनाश धर्माधिकारी यांच्या हस्ते नाशिकमधील ग्रामीण भागातील शाळांमधील कर्तबगार १८ शिक्षकांना तसेच नाशिक शहरातील शिक्षकेतर ४ तज्ज्ञ प्रशिक्षकांनासुद्धा प्रदान करण्यात आले. रोटरी इंडिया लर्निंग मिशनअंतर्गत संपूर्ण देशात टीच हा उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमाअंतर्गत संपूर्ण भारत देश साक्षर करण्याचा संकल्प रोटरीने केला आहे. या कार्यक्रमाला रोटरी क्लब ऑफ नाशिकच्या अध्यक्षा डॉ. श्रीया कुलकर्णी, सचिव मंगेश अपशंकर, विनायक देवधर, रेखा पटवर्धन, मकरंद चिंधडे, सलीम बटाडा, मंगेश पिसोळकर, आंचल दिनानी, अनिल सुकेणकर, सुरेखा राजपूत, उर्मी दिनानी उपस्थित होते.