लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्हा परिषदेच्या बदली पात्र शिक्षकांची आॅनलाइन बदल्यांची माहिती शासनाच्या पोर्टलवर सादर करण्याची मुदत टळूनही सदरचे पोर्टल शासनस्तरावर बुधवारी सायंकाळपर्यंत सुरू असल्याचे सांगण्यात आले असले तरी जिल्हा परिषदेच्या पातळीवर बदल्यांची कार्यवाही पूर्ण झाल्यामुळे गुरुवारी सायंकाळनंतर बदल्यांचे आदेश जारी होण्याची शक्यता शिक्षण विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केली.
नाशिक जिल्हा परिषदेत सुमारे अकरा हजार शिक्षक असून, शासनाने यंदा फक्त दहा टक्के बदल्या करण्याचे ठरविले आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यात साधारणत: दीड ते दोन हजार शिक्षकांच्या बदल्या होतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यातही प्राधान्याने पहिल्या टप्प्यातील विशेष संवर्गातील शिक्षक व पती-पत्नी एकत्रितीकरण यांच्या बदल्या केल्या जातील. शासनाने ६ ते ११ जूनपर्यंत बदली पात्र शिक्षकांना आॅनलाइन अर्ज करण्याची मुदत दिली होती. मंगळवारी सायंकाळी पाच वाजता ही मुदत संपुष्टात आल्याने शासनाचे पोर्टल बंद होण्याचा अंदाज होता. प्रत्यक्षात बुधवारी सायंकाळपर्यंत पोर्टल सुरू असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले; मात्र असे असले तरी, जिल्हा परिषदेचे काम पूर्ण झाले असून, गुरुवारपासून शिक्षकांच्या बदल्यांचे आदेश जिल्हा परिषदेला प्राप्त होतील व त्यानंतर ते संबंधित शिक्षकांना बजावण्यात येतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू होण्यापूर्वी म्हणजेच शनिवारपर्यंत ही सारी प्रक्रिया पार पडेल, असा दावाही केला जात आहे. दरम्यान, शिक्षक बदल्यांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेत गर्दी होऊ लागली असून, बुधवारी त्याचे प्रत्यंतर आले, बदल्यांसाठी आलेल्या कर्मचाऱ्यांकडून जिल्हा परिषदेचे पदाधिकारी तथा अधिकाऱ्यांच्या भेटीसाठी रीघ लागल्याचे दिसून आले.