दरवर्षी जूनच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यातील सर्वच शाळा सुरू होतात. नवीन प्रवेशासाठी पालक, विद्यार्थी, शिक्षक यांची लगबग सुरू होते. शहरी भागातील पालक इंग्रजी माध्यमातील शाळांना प्राधान्य देतात. ग्रामीण भागातील काही पालक ही त्याच मार्गाचे अनुकरण करताना दिसतात. प्रवेश घेताना शाळा इमारत, सुविधा, शिक्षण दर्जा, वाहन सुविधा आदी बाबी विचारात घेऊन प्रवेश निश्चित करतात, मात्र जिल्ह्यातील ग्रामीण व काही शहरी भागात जिल्हा परिषद व माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षकांना मात्र नवीन प्रवेशासाठी दाखले व विद्यार्थी मिळविताना मोठी कसरत करावी लागत आहे.
तुकडी वाचविण्यासाठी विद्यार्थी संख्येची अट असल्याने कोणत्याही परिस्थितीत शाळेचा पट राखण्यासाठी शाळेतील शिक्षकांची मे महिन्यापासूनच विद्यार्थी शोधमोहीम चालू होते. यासाठी शिक्षकांना मोठी कसरत करावी लागत आहे. कोरोनाकाळात जसे हॉस्पिटल मिळणे अवघड होते तसे नवीन विद्यार्थी मिळण्याचे झाले आहे. मिळेल तिथून हजार, पाचशे देऊन विद्यार्थी व दाखला आणणे हेच काम महत्त्वाचे झाले आहे. शासनाने जन्मदर लक्षात घेऊन शाळा, तुकडी व विद्यार्थी संख्या निश्चित करावी तसेच शाळांनीदेखील इमारत सुधारणा, सुविधा याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.
इन्फो...
● जन्मदर कमी, विद्यार्थी वाढतील कोठून?
● शासनाने जन्मदर विचारात घेऊन विद्यार्थी संख्या निश्चित करावी.
● इंग्रजी माध्यमाच्या तुलनेत इतर शाळा कुठे कमी पडतात?
● भौतिक सुविधा कमी पडतात का?