नाशिक : जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर यांच्या जागेवर नियुक्त करण्यात आलेल्या प्रभारी शिक्षणाधिकारी तथा सहायक शिक्षण उपसंचालक पुष्पा पाटील यांनी सोमवारी (दि.२३) कार्यभार स्वीकारताच माध्यमिक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतन देयकावर स्वाक्षरी केली आहे. त्यांच्या स्वाक्षरीनंतरही शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतनाची प्रतीक्षा कायम असून, स्वाक्षरीनंतर दोन दिवसांचा कालावधी उलटूनही वेतन झाले नसल्याने शिक्षकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर यांना लाच प्रकरणात अटक केल्यानंतर त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली होती. आता त्यांना जामीन मिळाला असला तरी त्यांचे निलंबन झाले आहे. यादरम्यानच्या कालावधीत त्यांच्या अटकेचा फटका नाशिक जिल्ह्यातील जवळपास १८ हजार शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बसला असून, त्यांचे जुलै महिन्याचे वेतन रखडले आहे. त्यामुळे शिक्षण उपसंचालक कार्यालयाने प्रभारी माध्यमिक शिक्षणाधिकारी पदावर सहायक उपशिक्षणाधिकारी पुष्पा पाटील यांची नियुक्ती केली आहे. त्यांनी सोमवारी (दि.२३) कार्यभार स्वीकारताच प्रथम शिक्षकांच्या देयकावर स्वाक्षरी केली; परंतु त्यांनी स्वाक्षरी केल्यानंतर दोन दिवसांचा कालावधी उलटूनही अद्याप शिक्षक व शिक्षकेतरांच्या खात्यावर वेतन जमा झालेले नाही.
दरम्यान, शिक्षकांच्या वेतनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, एक-दोन दिवसांत शिक्षकांच्या खात्यावर त्यांचे वेतन जमा होणार असल्याची माहिती शिक्षण विभागातील सूत्रांनी दिली.