नांदगाव : कोरोना काळातला वेळ अध्यापनाचे नवीन मार्ग शोधून काढण्यासाठी आणि शाळेचे सौंदर्य खुलविण्यासाठी खर्च करणाऱ्या चांदोरे जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांनी नव्या पाऊल वाटा शोधल्या आहेत. शाळेची भिंत धुण्यापासून आकर्षक चित्रांनी परिसर बोलका करण्यापर्यंत व परिसराला हिरवाईचा शालू नेसवण्यापर्यंत शिक्षकांनी अपार मेहनत केली. हे बघितल्यावर गावकरी पुढे आले. शिक्षक व गावकरी यांनी एक लाखाचा निधी गोळा केला. अनुदान व इतर मदत यातून शाळेचे रूप बदलून गेले. शाळेच्या भिंतीवरचे विद्यार्थ्याचे बोलके चित्र... शाळेत येण्यासाठी खुणावत आहे. शिक्षकांनी कोविडच्या बंद काळात वेळेचा पुरेपूर वापर करून शाळेचा परिसर स्वच्छ केला. भिंतींवर काढलेल्या चित्रात शाळेत खेळणारी, बागडणारी मुले बघून आम्हाला कोरोनापूर्व काळातील गजबजलेल्या शाळेची आठवण होते आणि मन भरून येते अशी प्रतिक्रिया शिक्षक अविनाश खैरनार यांनी दिली. यासाठी मुख्याध्यापक राजेंद्र पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले, असे खैरनार म्हणाले. शैक्षणिक उठावातून शाळेचे बाह्य रूप बदलले असले तरी विद्यार्थ्यांचा आंतरिक पाया भरणे महत्त्वाची आहे. कोरोनाने उसंत दिली की, आम्ही या चिमुकल्यांसाठी अधिक वेळ खर्च करून त्यांना घडवूच. शिक्षणाचा अनुशेष भरून काढू, असे खैरनार व इतर शिक्षकांचे म्हणणे आहे.
-------------------------
विद्यार्थ्यांच्या घरोघर पोहोचविली स्वाध्यायपुस्तिका
शाळेच्या अंतर्गत ६०० फूट पाईपलाईन करून नळाद्वारे झाडांना पाणी देणे, अद्ययावत कार्यालय, स्वच्छ व सुंदर खेळाचे मैदान, परिपूर्ण खेळाचे साहित्य असे नियोजन करून शिक्षक आता शाळा कधी सुरू होतील, असे म्हणताना विद्यार्थ्यांच्या प्रतीक्षेत दिसून येत आहेत. २००च्या पटावर १४० विद्यार्थी अनुसूचित जाती जमातीचे आहेत. ग्रामीण भागात ऑनलाईन शिक्षण देणे अवघड आहे. शक्य असेल तेव्हा पहिली ते तिसरीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना घरी जाऊन शिक्षक भेटले. ६ व ७वीचे वर्ग ऑनलाईन घेतले. ऑनलाईन शिक्षण समस्येवर मात करण्यासाठी शिक्षकांनी वर्गणी गोळा केली. स्वाध्यायपुस्तिका स्वत: बनवून ती छापून विद्यार्थ्यांच्या घरोघरी पोहोचवली. त्यांच्या घरी जाऊन अडचणी सोडविल्या.
------------
नांदगाव तालुक्यातील चांदोरा जि. प. शाळेचे कोरोना काळात पालटलेले देखणे रूप. (१३ नांदगाव १/२)
===Photopath===
130521\13nsk_4_13052021_13.jpg
===Caption===
१३ नांदगाव १/२