सिन्नर : मुल्यांकन झालेल्या शाळांना त्वरित अनुदान द्यावे या प्रमुख मागणीसह अन्य विविध मागण्यांसाठी शिक्षक संघटनांनी नाशिक येथील शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर साखळी उपोषणास प्रारंभ केला आहे. २८ आॅगस्ट २०१५ चा जाचक शासन निर्णय रद्द करा, अंशदायी पेन्शन योजना रद्द करुन जुनी पेन्शन योजना लागू करा, अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्याच्या वेतनास संरक्षण द्यावे, अतिरिक्त शिक्षकांचे पगार त्वरित आॅनलाईन करावे, २०१६-१७ च्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त ठरवावे, शालेय पोषण आहार योजना शहरीभागाप्रमाणे ग्रामीण भागातही लागू करावी आदि मागण्यांचे निवेदन यावेळी शिक्षण उपसंचालक नवनाथ औताडे यांना देण्यात आले. त्यानंतर नाशिक जिल्हा कृती समितीचे अध्यक्ष भारत भामरे, उपाध्यक्ष बाळासाहेब ढोबळे, सचिव दत्तात्रय धात्रक, गोरख कुळधर, सुभाष पवार, नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाचे कार्यवाह एस. बी. देशमुख, एस. बी. सिरसाट, आर. डी. निकम, मोहन चकोर यांच्या नेतृत्वाखाली साखळी उपोषणास प्रारंभ करण्यात आला. शासन जोपर्यंत सर्व मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत साखळी उपोषण सुरु ठेवणार असल्याचे कृती समिती, मुख्यापक संघ, टीडीएफ व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. जीभाऊ शिंदे, संजय देवरे, डी. एस. ठाकरे, राजेंद्र लोंढे, भाऊसाहेब सिरसाट, बी. आर. पाटील, रामराव बानकर, साहेबराव कुटे, अविनाश चौधरी, सचिन बाविस्कर, गोकूळ महाले, जगदीश मोरे, नईम शाईन, भाऊसाहेब मापारी यांच्यासह सुमारे ३५० शिक्षक व मुख्याध्यापक उपोषणात सहभागी झाले आहेत. (वार्ताहर)
शिक्षकांचे साखळी उपोषण
By admin | Published: June 04, 2016 10:24 PM