लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या सर्वसाधारण बदल्यांविषयी २७ फेब्रुवारीच्या शासन निर्णयाविरोधात नाशिक जिल्हा शिक्षक संघटना समन्वय समितीने शनिवारी (दि.१७) जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषदेवर मोर्चा काढून बदल्यांच्या निषेध नोंदवला. बदल्यांविषयीच्या निर्णयातील त्रुटी दुरु स्त करण्याचे आश्वासन प्रशासनाने पाळले नसल्याचा आरोप करीत शिक्षकांनी शहरातून मोर्चा काढून २०१७-१८ शैक्षणिक वर्षासाठी शिक्षकांच्या बदल्या स्थगित करण्याची मागणी केली. राज्यातील प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीने शासनासोबत शिक्षकांच्या बदल्या व अन्य प्रलंबित प्रश्नांबाबत चर्चा व पत्रव्यवहार करूनही केवळ आश्वासनाशिवाय कोणताही ठोस निर्णय झाला नाही. प्रशासनाने बदल्यांविषयीच्या निर्णयातील त्रुटींमध्ये दुरु स्ती करण्याचे आश्वासन पाळले नाही. त्यामुळे राज्य शिक्षक संघटना समन्वय समितीने शनिवारी मोर्चा काढून आंदोलन केले. या माध्यमातून शिक्षक संघटनांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेतील १०० टक्के विद्यार्थ्यांना गणवेश मिळावा, २७ फेब्रुवारी २०१७ च्या बदलीविषयक शासन निर्णयात समन्वय समितीने सुचिवल्याप्रमाणे बदल करण्यात यावा, १५ जूनपासून शाळा सुरू झाल्याने विद्यार्थीहितासाठी यावर्षीच्या बदल्या रद्द करून जाचक अटींची दुरु स्ती करावी, शाळांच्या विद्युत बिलाची तरतूद करून आॅनलाइन कामासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यात याव्यात, १ नोव्हेंबर २००५ नंतरच्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, संगणक प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी सप्टेंबर २०१७ पर्यंत मुदतवाढ द्यावी, पतसंस्थेची अट न ठेवता अंशकालीन निर्देशकांची पदे प्रत्येक शाळेत भरण्यात यावी, वसतिशाळा शिक्षकांची जुनी सेवा कायम करण्यात यावी, मासिक वेतन दरमहा एक तारखेस व्हावे, पदवीधर शिक्षकांना सरसकट ४३०० ग्रेड पे देण्यात यावा, उपशिक्षणाधिकारी व तत्सम पदांच्या स्पर्धा परीक्षांसाठी प्राथमिक शिक्षकास पात्र ठरवावे, शालेय पोषण आहार व बांधकामे मुख्याध्यापकांकडून काढून घ्यावीत, सर्व शाळांना मोफत वीज व पाणी द्यावे यांसह वेगवेगळ्या मागण्यांसाठी जिल्ह्यातील शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने शनिवारी जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. विविध मागण्यांचे फलक हातातशिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांसह बदल्या स्थगित करण्यासाठी शिक्षकांनी गोल्फ क्लब मैदान येथून काढलेला मोर्चा पहिल्यांदा जिल्हा परिषदेवर येऊन धडकला. येथे शिष्टमंडळाने मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिले. त्यानंतर शालिमार, रेडक्रॉस सिग्नल व एमजी रोडमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा आल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात समन्वय समितीच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले. दोन्ही कार्यालयात निवेदन सादर केल्यानंतर छत्रपती शिवाजी स्टेडिअम येथे मोर्चाचा समारोप करण्यात आला. मोर्चातील शिक्षक अधूनमधून बदल्या रद्द झाल्याचं पाहिजे, जुनी पेन्शन लागू करा, अशा घोषणा देत होते. मागण्यांचे फलक हातात घेऊन मोठ्या संख्येने शिक्षक-शिक्षिका मोर्चात सहभागी झाले होते.
बदल्यांविरोधात शिक्षकांचा मोर्चा
By admin | Published: June 18, 2017 1:05 AM