नाशिक : जिल्ह्यातील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अडचणी व तक्रारींसंदर्भात प्रलंबित मागण्यांसाठी नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ व नाशिक जिल्हा टीडीएफ तसेच नाशिक जिल्हा शिक्षक परिषदेच्या पदाधिकारी व सभासदांनी गुरुवारी (दि. २०) माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाला कुलूप ठोकत आंदोलन केले.
शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी विविध शिक्षक संघटांनी तीन दिवसांपूर्वीच माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयास कुलूप ठोकण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार गुरुवारी जिल्हाभरातील पदाधिकारी शिक्षणाधिकारी कार्यालयात दाखल झाले होते. मात्र शिक्षणाधिकारी कार्यालयात उपस्थित नसल्याने शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी भ्रमणध्वनीवरून त्यांच्याशी संपर्क केला. शिक्षणाधिकारी बाहेरगावी असल्याने त्यांनी अधीक्षक सुधीर पगार व उपशिक्षणाधिकारी अनिल शहारे यांना शिक्षकांच्या प्रतिनिधी मंडळासोबत चर्चेसाठी पाठविले. यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी वेतन पथक कार्यालयाबद्दल तक्रारींचा पाढा वाचला, गेल्या अनेक वर्षापासून पुरवणी बिले कढली नसल्याची तक्रार केली. यावेळी वेतन पथक अधीक्षक उदय देवरे यांनी १५ फेब्रुवारीपर्यंत सर्व प्रकारचे मेडिकल बिले काढल्याचे सांगितले असता शिक्षकांनी प्रलंबित बिले पुरावे म्हणून सादर केले. दरम्यान, लॉकडाऊन काळातही काही संस्थाचालक व मुख्याध्यापक शिक्षकांना शाळेत येण्याबाबत करीत अनुपस्थितांना कारणे दाखवा नोटिसा देत असल्याची तक्रारही शिक्षकांनी यावेळी मांडली. तसेच वरिष्ठ श्रेणी, निवड श्रेणी व वैयक्तिक मान्यता, पदोन्नती, याबाबतही अधिकाऱ्यांना कोणतीही मुद्देसूद माहिती देता आले नाही, त्यामुळे शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर यांच्याविरोधात निषेध नोंदविण्यासाठी शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षणाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन करीत त्यांच्या खुर्चीला शिक्षकांच्या मागण्यांचे निवेदन चिटकवून कार्यालयाला अखेर कुलूप ठोकले. दरम्यान, अधीक्षक सुधीर पगार व शहारे यांनी गुरुवार (दि. २७) वेतन पथक अधीक्षक यांच्या समवेत बैठक घेऊन शिक्षकांच्या सोडविण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात घेत शिक्षकांनी शिक्षणाधिकारी कार्यालयाचे कुलूप काढले. यावेळी जिल्हा मुख्याध्यापक संघाचे कार्याध्यक्ष साहेबराव कुटे, जिल्हा टीडीएफचे अध्यक्ष आर. डी. निकम, अनिल अहिरे, जयेश सावंत, शिक्षक परिषदेचे दत्ता पाटील, माध्यमिक शिक्षक संघटनेचे राज्य समन्वयक नीलेश ठाकूर, प्रदीप सिंग पाटील, त्र्यंबक मार्तंड, मनोहर देसाई, देशमुख अण्णा सचिन देशमुख, अशोक मार्तंड, सचिन शेवाळे, आशिष पवार, राजेंद्र शेळके डी. आर. पठाडे, आदी पदाधिकारी उपस्थित होते.
===Photopath===
200521\20nsk_16_20052021_13.jpg
===Caption===
माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयास कुलूप लावताना साहेबराव कुटे, आर. डी. निकम, अनिल अहिरे, जयेश सावंत, दत्ता पाटील, नीलेश ठाकूर, प्रदीप सिंग पाटील, त्र्यंबक मार्तंड, मनोहर देसाई आदी