नाशिक : राज्य शासनाच्या निर्देशानुसार साथरोगाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्यासंदर्भातील कामकाजासाठी पाचवी ते आठवीच्या वर्गाला शिकविणाऱ्या १०० टक्के अनुदानित शिक्षकांची नियुक्ती करण्यासंदर्भात मनपा शिक्षण विभागाने शुक्रवारी (दि.२३) दुपारी ३.३० वाजता बोलविण्यात आलेली बैठक रद्द करण्यात आली आहे. आता ही बैठक सोमवारी (दि.२६) दुपारी २.३० वाजता होणार असून, कोरोना सेवेसाठी शिक्षकांचा विरोध क्षमवून त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न महापालिका प्रशासनाकडून होत आहे.
राज्य शासनाच्या आदेशानुसार कोरोना प्रतिबंधात्मक कामकाजासाठी शिक्षकांच्या नियुक्तीसंदर्भात कार्यवाहीसाठी महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून १०० टक्के अनुदानित शाळांमधील पाचवी ते आठवीच्या वर्गांना शिकविणाऱ्या शिक्षकांची माहिती मागविली होती. मात्र शिक्षक संघटनांनी या कार्यवाहीला विरोध करीत अशाप्रकारची माहिती देण्यास व कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या कामकाजास विरोध दर्शविला होता.
त्यामुळे शिक्षण विभागाकडून शुक्रवारी (दि. २३) मनपा अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे यांच्या दालनात दुपारी ३.३० वाजता नाशिक जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष गुलाबराव भामरे, कार्याध्यक्ष साहेबराव कुटे व कार्यवाह आर. डी. निकम या शिक्षक प्रतिनिधींना चर्चेसाठी आमंत्रित केले होते. परंतु तांत्रिक कारणाने ही बैठक रद्द करण्यात आली असून, आता ही बैठक सोमवारी दुपारी २.३० वाजता होणार असल्याची माहिती महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी सुनीता धनगर यांनी दिली आहे.