सिन्नर: तालुक्यातील पाडळी येथील पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांनी वाडीवस्त्यांवर जात गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना अध्यापन करत आगळा-वेगळा उपक्रम राबवला. सद्या सर्वांनाच कोरोना महामारी ग्रासले असून शासनाने शिक्षण तुमच्या दारी म्हणून आॅनलाईन शिक्षण सुरु ठेवले आहे. तथापि, आॅनलाईन शिक्षणासाठी महागडया एंड्रॉइड मोबाईल व त्यासाठी लागणारी इंटरनेट सुविधा गरिबांच्या पदरी कोठून, जे मोल मजुरी करून कुटुंबाचे गुजराण करतात अशा गरीबांच्या मुलांना आॅनलाईन शिक्षण मिळणे दिवास्वप्नच ठरते. जूनमध्ये शाळा उघडेल या अपेक्षेने चातक पक्षा प्रमाणे वाट बघितली पण वेगळेच संकट पुढे ठाकले. त्यावर पर्याय म्हणून मुख्याध्यापक एस. बी. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली एक अभिनव कल्पना साकारण्याचे ठरविले व सर्व शिक्षकांनी मनाला हुरहूर लावर्णाया अभ्यास उपक्रमासंदर्भात पाडळी येथील ठाकरवाडी, टोळेवस्ती, लिंबाचीवाडी, मोखरेचीवाडी, बोगीरवाडी, टेंभूरवाडी, दत्तवाडी या वस्तीवर जाऊन त्या मुलांना एकत्र जमा करून त्या सर्वांना मास्क दिले व सॅनिटायजरचा वापर करून सोशल डिस्टन्स ठेवून त्यांना शालेय शिक्षणाप्रमाणे अभ्यास देण्यास सुरवात केली व त्या विद्यार्थ्यांच्या मनातील भिती जाऊन ती इतर मुलांप्रमाणे अभ्यासात रंगु लागली व आपल्या पालकांकडे असलेल्या साध्या मोबाईलचा शैक्षणिक साधन म्हणून वापर करून शिक्षकांशी संवाद साधू लागले. विद्यालयातील शिक्षक बी. आर. चव्हाण, आर. व्ही. निकम, एस. एम. कोटकर, आर. टी. गिरी, एम. सी. शिंगोटे, एम. एम. शेख, सविता देशमुख, टी. के. रेवगडे, सी. बी. शिंदे, के. डी. गांगुर्डे, एस. डी. पाटोळे, आर. एस. ढोली, के. पी. साठे, ए. बी. थोरे हे परिश्रम घेत आहेत.