शाळा व कॉलजचे दिवस संपले की प्रत्येकजण आपापल्या करिअरसाठी वेगवेगळ्या क्षेत्राकडे धाव घेतानाच काैटुंबिक जबाबदारीत अडकून पडताे. मात्र ३१ वर्षांचा मोठा कालखंड लोटल्यानंतरही जनता विद्यालय सातपूरच्या शाळेतील १९८९ सालातील दहावीच्या बॅचमधील काही विद्यार्थ्यांनी परिश्रम घेऊन सर्वांना एकत्र आणण्याची किमया घडवून आणली. प्रत्येकजण आपापल्या नोकरीधंद्यात व्यस्त असल्याने हे सहजासहजी शक्य होत नाही. ते अशक्यही नसते. विद्यालयातून १९८९ साली उत्तीर्ण होऊन गेलेल्या विद्यार्थ्यांनी दाखवून दिले. फक्त विद्यार्थीच नव्हे तर त्यांना ज्ञानाचे दान देणाऱ्या गुरुजनांचाही शाेध घेऊन त्यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी खास मेळाव्याचे आयाेजन केले. मेळाव्याच्या निमित्ताने परत एकदा एकत्र आलेले सर्व माजी विद्यार्थी जुन्या आठवणीत हरवून गेले होते. प्रारंभी सी. बी. पवार या शिक्षकांनी मेळाव्यास उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थ्यांची हजेरी घेतली. विद्यार्थ्यांनीही ‘यस सर’ म्हणत आपली उपस्थिती दर्शविली. अध्यक्षस्थानी निवृत्त मुख्याध्यापक ए. पी. पिंगळे यांची निवड करण्यात आली. व्यासपीठावर सेवानिवृत्त शिक्षिका मंगला पिंगळे, विमल उगले-जाधव, सुवर्णा शिंदे- काेकाटे, विजया शिंदे, तिलाेत्तमा वर्मा, भारती पवार, सखाराम घाटाेळ, श्यामराव गावले, श्यामराव महाले, देवराम काेल्हे आदी उपस्थित हाेते. माजी विद्यार्थी गाेरख तिडके, तानाजी दातीर, श्रीराम हाबू, सदाशिव विधाते, विनाेद मेतकर, साेनल गवांदे, जयश्री तिवारी यांनी मेळाव्यासाठी पुढाकार घेतला. माजी विद्यार्थिनी डॉ. अनिता बेंडाळे यांनी सर्वांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप केले. शिक्षिका मीना देवरे, प्रतिभा निर्मळ यांनी सूत्रसंचालन केले. (फोटो ०७ सातपूर)
फोटो :- सातपूर गावातील जनता विद्यालयाच्या ३१ वर्षांपूर्वीच्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्याप्रसंगी ए. पी. पिंगळे, मंगला पिंगळे, विमल उगले, सुवर्णा शिंदे, ॲड. विजया शिंदे, तिलाेत्तमा वर्मा, भारती पवार, सखाराम घाटाेळ, श्यामराव गावले, श्यामराव महाले, देवराम काेल्हे आदींसह विद्यार्थी व शिक्षक.