संजय पाठक, नाशिक- विधान परिषदेच्या नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघात सध्या अमिष दाखवण्याची स्पर्धा सुरू आहे. पैठण्या आणि सोन्याच्या अंगठ्या देऊन मत खरेदी करण्याची पद्धत सुरू झाल्याची चर्चा सध्या होत आहे. या संदर्भात राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी शिक्षकांचा एक वेगळा आदराचा दर्जा आहे त्यामुळे सुमार दर्जाच्या पैठण्या आणि अन्य आमिष बघून मतदान करू नये असे आवाहन केले आहे.
छगन भुजबळ यांनी आज सकाळी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी हे आवाहन केले नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघाचा प्रचार जोरात सुरू असून विविध वस्तूंचे वाटप केले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर बोलताना भुजबळ म्हणाले की, शिक्षकांचा दर्जा वेगळा आहे त्यांना आपण गुरु मानतो मध्यंतरी काही पैठण्या वाटल्याचे कानावर आले दोनशे चारशे रुपयांच्या पैठण्या सुमार दर्जाच्याही होत्या अशा प्रकारच्या वस्तूंच्या अमिषाला बळी न पडता शिक्षकांनी मतदान निरपेक्ष बुद्धीने करावे असे ते म्हणाले. दरम्यान, राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होईल याबाबत आपल्याला माहिती नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना बरोबर घेऊन या संदर्भात निर्णय घेतील असे ते म्हणाले तर आरक्षणाबाबत बोलताना रखडलेल्या जनगणने बरोबरच जातगणनाही करावी म्हणजे ती कायद्याने योग्य राहील आणि खरी माहिती बाहेर येईल असेही भुजबळ म्हणाले.