नाशिक : नाशिक जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या सभेत लाभांशाच्या मुद्द्यावरून झालेल्या गदारोळात शिक्षकांमध्ये हाणामारीचा प्रकार घडल्याने प्रचंड गोंधळ उडाला. या गोंधळाच्या वातावरणात सत्ताधारी व विरोधी गटाचे समर्थक सभासद आमने-सामने आले. घोषणाबाजी, आरोप-प्रत्यारोप आणि हाणामारीच्या गोंधळातच अध्यक्षांनी सभा आटोपती घेतली.परशुराम साइखेडकर नाट्यगृहात रविवारी नाशिक जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या उपाध्यक्ष विजया पाटील यांच्या अध्यक्षतेत पार पडली. व्यासपीठावर मोहन चकोर, भाऊसाहेब पाटील, भाऊसाहेब शिरसाठ, बाळासाहेब ढोबळे, रामराव बनकर, संजय देवरे, जिभाऊ शिंदे आदि संचालक उपस्थित होते. सत्ताधारी संचालक मंडळ संस्थेचा नफा फुगवून दाखवित असल्याचा आरोप करीत सभासदांना ठेवींवरील व्याजदर आणि नफ्यातील लाभांश वाढवून देण्याची मागणी यावेळी सभासदांनी केली. सभासदांना ठेवींवर ८ टक्के व्याज मिळत असताना त्यात सुमारे २५ टक्के कपात करून रिझर्व्ह फंडातील रक्कम वाढवून संस्थेचा नफा वाढवून दाखवला जात असल्याचा आरोप सभासदांनी केला. तर मागील संचालक मंडळाने निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अधिक व्याजदर दिल्याचा युक्तिवाद सत्ताधारी गटाने केला. मात्र निवडणुकांपूर्वीच्या कार्यकाळातही ठेवींवर सात टक्क्यांहून अधिक व्याजदर मिळत असल्याने संचालकांच्या उत्तराने सभासदांचे समाधान झाले नाही. त्यामुळे सुरुवातीपासूनच सुरू असलेल्या गोंधळात भर पडली. सभासदांनी व्यासपीठावर चढून गोंधळ घालण्यास सुरुवात केली. पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र सभासदांनी कोणालाही न जुमानता अखेरपर्यंत गोंधळ सुरूच ठेवला. त्यामुळे सत्ताधारी गटांने सर्व ठरवांना मंजुरी देत सभा गुंडाळली. प्रास्ताविक उपाध्यक्ष विजया पाटील यांनी केले. सूत्रसंचालन मोहन चकोर यांनी केले. (प्रतिनिधी)
शिक्षक सोसायटी सभेत गुरुजींमध्ये हाणामारी
By admin | Published: August 29, 2016 12:46 AM