सिन्नर : जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांना आपली मासिक पगार बिले सादर करण्यासाठी सिन्नरच्या पंचायत समिती शिक्षण विभाग आणि शिक्षक संघटना समन्वय समिती, सिन्नर यांच्या माध्यमातून आॅनलाइन प्रणालीद्वारे उपलब्ध करून दिली असून, आता शिक्षकांना केवळ एका क्लिकवर आपली पगारपत्रके उपलब्ध करून दिली असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी मंजूषा साळुंखे यांनी दिली.नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांना आपली पगारपत्रके ई-सॅलरी बुक या अॅपच्या माध्यमातून आॅनलाइन घरबसल्या एका क्लिकवर बघता येणार आहे. याआधीच प्राथमिक शिक्षकांची पगारबिले ही शालार्थ प्रणालीद्वारे काढली जात होती. त्याचाच पुढील भाग म्हणून पं.स सिन्नर शिक्षण विभागातर्फे सर्वच शिक्षकांना या ई-सॅलरी बुक या अॅपच्या माध्यमातून सहजपणे पगारपत्रके पाहता येणार असल्याने शिक्षक तसेच प्रशासनाच्या दृष्टीने खूपच उपयुक्त ठरणार आहे.या प्रणालीमध्ये पगारपत्रक सहजपणे एका क्लिकवर उपलब्ध झाल्याने वेतनातील त्रुटी लक्षात येतात. त्यासाठी शिक्षकांना स्वत:चा मोबाइल क्रमांक, यूजर नेम आणि पासवर्ड वापरून फक्त आपला स्वत:चाच पगार पाहता येत असल्याने गुप्तता पाळली जाते. पगारपत्रकामध्ये मुख्याध्यापक यांच्याशिवाय इतर कोणालाही बदल करता येणार नाही. पगारपत्रकासोबत वर्षाअखेर भरावयाचे इन्कम टॅक्स स्टेटमेंट आपोआप उपलब्ध करून दिले जाते. या प्रणालीमुळे शिक्षकांचे वेतनासंबंधीच्या अडचणी दूर होणार असून सहज, सुलभ प्रणालीचा शिक्षकांना फायदा होणार असल्याचे गटशिक्षणाधिकारी मंजूषा साळुंखे यांनी सांगितले.--------------------अॅपमध्ये दिल्या जाणाऱ्या सुविधा..प्रत्येक महिन्याचे पगारपत्रक सहजपणे एका क्लिकवर उपलब्ध, शासन निर्णय, जीआर, विविध प्रस्ताव नमुने, माहितीपत्रके तत्काळ वेळेवर उपलब्ध, पगारपत्रक पीडीएफ स्वरूपात असल्याने तात्काळ प्रिंट काढता येतात, आर्थिक वर्षाच्या शेवटी आवश्यक असणारे इन्कम टॅक्स विवरण/स्टेटमेंट आपोआप तयार होते. परिणामी त्यात होणाºया चुका टाळल्या जातील. आपल्या पगारात काही बदल करावयाचे असल्यास किंवा काही शंका असेल तर अॅपवर तक्रार करण्याचीदेखील सुविधा उपलब्ध असणार आहे. या प्रणालीमुळे शिक्षकांच्या अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे.
शिक्षकांना घरबसल्या एका क्लिकवर मिळणार पगारपत्रके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2020 9:41 PM