घोटी : येथील ग्रामपालिकेचे प्रशासकीय मंडळ व पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यात झालेल्या आढावा बैठकीत घोटी शहराच्या १८ कोटी रुपये खर्चाच्या नवीन पाणीपुरवठा योजनेस तांत्रिक मंजुरी मिळाली.
पंधरा दिवसांपूर्वी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हे इगतपुरी तालुका दौऱ्यावर असताना घोटी पाणीपुरवठा योजनेला महिनाभरात गती देऊ अशी ग्वाही त्यांनी ग्रामपालिका सदस्यांना दिली होती. याच पार्श्वभूमीवर बुधवारी मंत्रालयात आढावा बैठक झाली. या योजनेला यापूर्वीच प्रशासकीय मंजुरी मिळाली होती. आता तांत्रिक मंजुरी मिळाल्याने लवकरच या योजनेबाबत निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. भावली धरणातून घोटी शहराला शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे यासाठी ही योजना प्रस्तावित होती. दोन वर्षांपासून या योजनेबाबत ग्रामपालिका प्रशासनाचा पाठपुरावा सुरु होता.
मंत्रालयात झालेल्या बैठकीप्रसंगी सरपंच सचिन गोणके, उपसरपंच रामदास भोर, ग्रामपालिका सदस्य संजय आरोटे, श्रीकांत काळे, संजय जाधव, यांच्यासह माजी आमदार काशिनाथ मेंगाळ, शिवसेना उपतालुकाप्रमुख कुलदीप चौधरी, शरद हांडे आदी उपस्थित होते.