कळवणचे तत्कालीन आमदार ए. टी. पवार व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार यांनी या संदर्भात राज्यपाल, राज्य शासनाकडे पत्रव्यवहार करुन मागणी केली होती, त्याची दखल घेऊन तंत्रनिकेतन विभागाचे सचिव डॉ. सुभाष महाजन यांनी या संदर्भात प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देऊन जागेची पाहणी करण्यासंदर्भात आदेश दिले होते. समितीच्या सदस्यांनी तत्कालीन सहायक जिल्हाधिकारी डी. गंगाधरण यांची भेट घेऊन जागेसंदर्भात केलेली मागणी धुडकावून लावल्यामुळे हा प्रश्न मार्गी लागला नव्हता. प्रलंबित असलेल्या या मागणीचा आमदार नितीन पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याकडे पाठपुरावा केल्याने पुन्हा नव्याने प्रस्ताव सादर करण्याचे आदेश तंत्रशिक्षण विभागाला दिले आहे. यासंदर्भात शासकीय समितीचे सदस्य जी. सी. खुरसाडे, एन. एल. पाटील, आर. एस. शुक्ल यांनी परिसरातील जागेची पाहणी करुन मानूरचे तलाठी बच्छाव, जलसंपदा विभागाचे घोडे यांच्याकडून माहिती घेतली. तसेच तंत्रनिकेतन, अभियांत्रिकी महाविद्यालय, विद्यार्थी वसतिगृहसाठी जागा योग्य असल्याचे सांगून वरिष्ठ कार्यालयात जागा निश्चितीचा अहवाल सादर करणार असल्याचे सांगितले.
कळवण ,सुरगाणा ,बागलाण ,देवळा ,पेठ ,इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर या आदिवासी तालुक्यातील बहुतांशी विद्यार्थी ,विद्यार्थिनी यांना व्यावसायिक शिक्षणासाठी मुंबई ,पुणे आणि नाशिक तसेच अन्यत्र जावे लागते हे आमदार नितीन पवार यांनी उपमुख्यमंत्री व तंत्रशिक्षणमंत्री यांच्या निदर्शनास आणून दिले. आदिवासी भागाचा अनुशेष भरून निघण्यासाठी कळवण येथे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, तंत्रनिकेतन सुरू करण्यास खास बाब म्हणून मंजुरी देण्याची विनंती पवार यांनी केली आहे. तंत्रशिक्षण मंत्री सामंत यांनी उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या सचिवांना कळवण येथे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय व शासकीय तंत्रनिकेतन सुरू करण्याबाबत तत्काळ योग्य कार्यवाही करुन अहवाल सादर करण्याचे सुचित केले आहे.
फोटो - १३कळवण१
कोल्हापूर फाट्यावरील जागेची पाहणी करताना शासकीय समितीचे सदस्य जी. सी. खुरसाडे, एन. एल. पाटील, आर. एस. शुक्ल आदी.
130921\13nsk_46_13092021_13.jpg
कोल्हापूर फाट्यावरील जागेची पाहणी करतांना शासकीय समितीचे सदस्य जी. सी. खुरसाडे, एन. एल. पाटील, आर. एस. शुक्ल आदी.