झोडगे : डिजिटल युगात ब्लॉग निर्मितीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या शाळांचा असलेला सहभाग ही आनंददायी बाब आहे. तंत्रज्ञानाचा उपयोग दैनंदिन अध्यापनात करून विद्यार्थ्यांना प्रगत करावे, असे प्रतिपादन पंचायत समितीच्या सभापती प्रतिभा सूर्यवंशी यांनी केले.तालुक्यातील द्याने केंद्रातील सर्व शाळांनी नुकतेच स्वतंत्र ब्लॉग तयार केले आहेत. या शाळांमधील तंत्रस्नेही शिक्षक व मार्गदर्शक अधिकाºयांचा येथील पंचायत समितीतर्फे गौरव करण्यात आला होता. याप्रसंगी पंचायत समितीच्या सभापती सूर्यवंशी बोलत होत्या. व्यासपीठावर उपसभापती अनिल तेजा, पंचायत समिती सदस्य अरुण पाटील, गणेश खैरनार, भगवान मालपुरे, नंदलाल शिरोळे, शंकर बोरसे, बापू पवार, सुरेखा ठाकरे, सुवर्णा देसाई, सरला शेळके, कमलबाई मोरे, गटविकास अधिकारी आनंद पिंगळे, द्याने केंद्रप्रमुख शारदा पवार आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. सूर्यवंशी पुढे म्हणाल्या की, विद्यार्थ्यांना प्रगत करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा जेणेकरून स्पर्धेत विद्यार्थी टिकून राहतील. यावेळी गटविकास अधिकारी आनंद पिंगळे म्हणाले की, जि. प. शाळांच्या विकासातील अडथळ्यांची शर्यत पार करून सर्व शाळांचा स्वतंत्र ब्लॉग असलेले द्याने हे केंद्र राज्यातील पहिले केंद्र आहे. ही तालुक्यातील शैक्षणिक विकासातील मोठी प्रकाशवाट आहे. ब्लॉग निर्मितीबरोबरच ब्लॉग अपडेट ठेवणे तेवढेच गरजेचे आहे, तशी काळजी तंत्रस्नेह शिक्षकांनी घ्यावी, असे आवाहन केले. यावेळी उपसभापती तेजा, पंचायत समिती सदस्य अरुण पाटील, द्याने केंद्राच्या पवार, शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष पृथ्वीराज शिरसाठ, संदीप सूर्यवंशी यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाच्या प्रारंभी नूतन चौधरी (टेहरे), भरत पाटील (माळीनगर), तानाजी शिंदे (सायतरपाडे) या शिक्षकांनी ब्लॉगचे सादरीकरण केले. यावेळी गटशिक्षणाधिकारी डी. एस. गायकवाड, विस्तार अधिकारी डी. जे. पवार, हंसराज देसाई यांच्यासह तंत्रस्नेही शिक्षक, पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.
तंत्रस्नेही शिक्षकांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 11:55 PM