नाशिक : मराठी नाटकाची सुरुवातीची तथा मध्यांतराची सूचना देणारी घंटा, जाहिरात, नाटकाचे नेपथ्य, प्रकाश योजना आदि विविध आधुनिक साधनांच्या माध्यमातून नाटकात अनेक बदल झाले खरे, परंतु या बदलांमुळे नाटक समृद्ध नव्हे, तर सोयीचे होत गेले, असे प्रतिपादन कवी प्रदीप वैद्य यांनी केले. सार्वजनिक वाचनालयाच्या ग्रंथसप्तहाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर कवी किशोर पाठक, सावानाचे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर, कार्यवाह अॅड. अभिजित बगदे, उपाध्यक्ष नरेश महाजन व वेदश्री थिगळे उपस्थित होते. वैद्य म्हणाले, नाटकांच्या विकासासाठी अनेकजण काम करीत असले तरी त्यांचे प्रयत्न अपुरे पडत असून, मराठी नाटकांसमोर आव्हाने उभी ठाकली आहे. त्यासाठी रंगभूमीचा पाया विकसित होणे गरजेचे असल्याचे मत वैद्य यांनी व्यक्त केले. महाराष्ट्रातील बहुतांश नाटककार मराठी नाटकांचा अभ्यास करण्यासाठी परदेशात जातात. मात्र ते काय अभ्यास करतात आणि त्याचा फायदा मराठी रंगभूमीला काय होतो हे अभ्यासणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. मराठी नाटकांसमोर दर्जेदार नेपथ्य, उत्कृष्ट लिखाण, पैशाचे पाठबळ, रंगभूमीच्या पठडीत तयार न झालेले कलाकार, योग्य मानधन, नाटकांच्या तारखा, वेळ यांसह तंत्रज्ञानाचे आव्हान आदिंसह विविध समस्या उभ्या आहेत. त्यातच योग्य ते सभागृह मिळत नाही. कलाकारांच्या दूरचित्रवाणीवरील उपस्थितीने नाटकांविषयी सौख्य कमी झाले आहे. कलाकारांच्या उपलब्धतेअभावी नाटकांचे तालुका ते जिल्हा व शहर पातळीवर दौरेही होत नसल्याची मराठी रंगभूमीची खंतही त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, बी. लिब व एम. लिब प्रथम येणाऱ्या प्रदीप वैद्य यांच्यासह बी. लिबमध्ये प्रथम येणारे सुभाषचंद्र अहेर व एम. लिब पदवीची परीक्षा प्रथम येणाऱ्या ज्योती बच्छाव यांना सत्कार करून सन्मानित करण्यात आले. (प्रतिनिधी)
तंत्रज्ञानाने नाटक सोयीस्कर झाले
By admin | Published: January 22, 2017 12:55 AM