नाशिक : किमान आणि कमाल तपमानात सातत्याने घसरण सुरूच असून, सोमवारी (दि.१७) किमान तपमानाचा पारा ८.५अंशांपर्यंत घसरला. या हंगामातील ही नोंद नीचांकी ठरली. एक दिवसात दोन अंशांनी तपमानात घट होण्याची ही पहिलीच वेळ आहे. आतापर्यंत ९.४ अंश इतकी या हंगामातील नीचांकी नोंद ठरली होती. मागील वर्षी डिसेंबरअखेर ७.५ अंश इतकी नीचांकी नोंद झाली होती. आठवडाभरापासून नाशिककर वाढत्या थंडीने गारठले असून, तपमानाचा पारा सातत्याने दहा अंशांच्या जवळपास स्थिरावत होता; मात्र सोमवारी पारा थेट आठ अंशांपर्यंत खाली आल्याने नाशिककर चांगलेच गारठले. नाशिककरांना पहाटेपासून दुपारपर्यंत हुडहुडी जाणवत होती. संध्याकाळी ५ वाजेनंतर पुन्हा गारवा वाढण्यास सुरुवात होते. रात्री उशिरापर्यंत हुडहुडी नागरिकांना सहन करावी लागत आहे. मागील सहा दिवसांपासून शहराचे किमान तपमान दहा अंशांच्या आसपास स्थिरावत आहे. गेल्या मंगळवारी (दि.११) हंगामातील नीचांकी ९.४ इतक्या तपमानाची नोंद झाली होती. कमाल तपमानात मागील पाच दिवसांपासून घसरण सुरूच असून, थंडीची तीव्रता अधिकच वाढली आहे. शहरात ८.५, तर निफाड तालुक्यात पारा थेट ७.२ अंशांपर्यंत खाली घसरला. दरम्यान, उत्तर महाराष्टÑातही थंडीचा जोर वाढला आहे.आरोग्यावर परिणाम; सर्दी-पडशाचे रुग्णवाढत्या थंडीमुळे नागरिक पहाटे व रात्री शेकोट्या पेटवून थंडीपासून बचाव करण्याचा प्रयत्न करत आहेत. संध्याकाळी साडेसात वाजेनंतर शहरातील बाजारपेठांमध्येही शुकशुकाट मागील चार दिवसांपासून दिसून येत आहेत. तसेच दिवसभर उबदार कपडे परिधान करण्यास नागरिक प्राधान्य देत आहेत. वाढत्या थंडीमुळे नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होऊ लागला आहे.या शहरांमध्ये थंडीचा जोरपुण्यात ८.३ , जळगावमध्ये ८.४, नाशिकमध्ये ८.५, तर अहमदनगरमध्ये ८.७ इतक्या किमान तपमानाची सोमवारी सकाळी नोंद झाली. राज्यातील ही शहरे थंडीने गारठली आहेत. महाबळेश्वर या थंड हवेच्या ठिकाणी किमान तपमान १०.४, तर साताऱ्यात ११.४ इतके किमान तपमान नोंदविले गेले.
तपमानाचा पारा ८.५ अंशांपर्यंत घसरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 1:32 AM