खामखेडा : सतत हवामानात होणाऱ्या बदलामुळे व वाढत्या तपमानामुळे पोल्ट्री फार्ममधील पक्षी मरण पावत असल्याने कुक्कुटपालन व्यवसाय धोक्यात आला आहे. त्यामुळे पोल्ट्री फार्म शेड रिकामे होत आहे असून, व्यावसायिक चिंताक्रांत झाले आहेत. शेतकरी जोड व्यवसाय म्हणून गायी, म्हशी, बकरी पालन म्हणजे दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात करीत आहेत. त्याचबरोबर गावठी कोंबड्याही मोठ्या प्रमाणात पाळत असून, त्यामुळे अंडी व चिकनचा प्रश्न काही प्रमाणात सुटत असे. परंतु जस-जसा शेतीच्या विकास होत गेला तसतसे शेतीपूरक जोडधंद्यांमध्ये वाढ झाल्याने दुय्यम दर्जाचे व्यवसायाची गरज भासू लागली आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपासून शेती व्यवसाय तोट्यात येऊ लागला आहे. शेतमाल कवडीमोल भावाने विकला जात आहे. शेतकºयांचा मुलगा जरी शिकला असला तरी त्याला नोकरी न मिळाल्यामुळे वेगवेगळ्या व्यवसायात शेतकºयांचे साधन बनू लागल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात पोल्ट्री व्यवसायाकडे वळू लागले. खामखेडा परिसरात मोठ्या प्रमाणात पोल्ट्री शेडचे उभे राहिले. या पोल्ट्री बांधकामासाठी मोठ्या प्रमाणात खर्च येतो. यंदा पाऊस, ढगाळ व अतिउष्ण वातावरणामुळे पोल्ट्री व्यवसाय धोक्यात आला आहे. बॉयलर कोंबडीसाठी थंड हवामान पोषक असते. या हवामानामुळे कोंबड्यांचा मृत्यू मोठ्या प्रमाणात होतो. या हवामानापासून पक्ष्यांचा बचाव करण्यासाठी पोल्ट्री शेडच्या पत्र्यावर उसाचे पाचट, बारदान, नाराळाच्या झाडाच्या फांद्या आदी टाकले जाऊन उष्ण वातावरणापासून रक्षण केले जात आहे. एवढेही करून या वर्षाचे वातावरण पोल्ट्री व्यवसायासाठी अनुकूल नाही. यामुळे अनेक पोल्ट्रीवाल्यांनी पोल्ट्री शेडमध्ये पिल्ले न टाकल्याने अनेक पोल्ट्री शेड रिकामे दिसून येत आहेत. त्यामुळे बॉयलरच्या भावात वाढ झालेली दिसून येत आहे.
तपमानवाढीचा फटका : पोल्ट्री व्यावसायिक चिंतित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 12:19 AM