देवळा : शहरातील ग्रामदैवत दुर्गामाता मंदिरासह निम गल्ली येथे जबर घरफोडी झाल्याने शहर व परिसरात एकच खळबळ उडाली असून, पोलिसांच्या निष्क्रियतेबद्दल जनतेत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान या चोरीमध्ये लाखो रुपये किमतीचा ऐवज चोरीला गेला आहे.देवळा पोलीस ठाण्याच्या समोर कोलती नदीपात्राशेजारील ग्रामदैवत दुर्गामाता मंदिरात सोमवारी पहाटे १ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून गाभाऱ्यात असलेली दानपेटी चोरून नेल्याची फिर्याद मंदिराचे पुजारी राहुल वाघमारे यांनी दिली आहे. सोमवारी (दि. १) सकाळी ६ वाजता नेहमीप्रमाणे पूजाअर्चा करण्यासाठी वाघमारे गेले असता प्रवेशद्वाराला लावलेले कुलूप तुटलेले दिसले व मंदिरातील दानपेटीचा साखळदंड तुटलेला व दानपेटी नाहीशी झाल्याचे आढळून आले. मंदिर समितीचे ट्रस्टी अंबादास आहिरराव यांनी घटनेची माहिती दिली. शहरात चोरीचे वृत्त समजताच जयप्रकाश कोठावदे, जितेंद्र आहेर, मोतीलाल लुंकड, राजू देवरे व ग्रामस्थ मंदिरात आले. यावेळी मंदिरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता पहाटे १ वाजेच्या सुमारास तोंडास रुमाल बांधलेल्या अज्ञात इसमांनी दानपेटी चोरून नेल्याचे स्पष्ट झाले.दुसरी घरफोडी निमगल्ली येथे झाली. विजय हरी गहिडे हे दि. २८ जानेवारी रोजी कुटुंबासह बाहेरगावी गेले होते. सोमवारी ते घरी परत आले असता घराचे कुलूप तोडून चोरी झाल्याचे लक्षात आले. अज्ञात चोरट्यांनी घरातील तीन लाख १४ हजार ६०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, ५५ हजार ६५० रुपये किमतीचा किराणा माल व रोख २० हजार रुपये असा एकूण तीन लाख ९० हजार ३०० रुपये किमतीचा ऐवज चोरीला गेल्याची फिर्याद विजय गहिडे यांनी देवळा पोलिसांत दिली आहे. शहरातील ह्या धाडशी चोऱ्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दुर्गामाता मंदिरातील चोरून नेलेली दानपेटी देवळा शहरानजीक असलेल्या रामेश्वर धरणाजवळ पडलेली सापडली. चोरट्यांनी पेटी फोडून रक्कम लंपास केली. सदर चोरीच्या तपासासाठी श्वानपथक व ठसेतज्ज्ञांनी घटनास्थळाची पाहणी केली असून, अधिक तपास पोलीस निरीक्षक सुनील टोणपे व सहकारी करीत आहेत. (वार्ताहर)
देवळ्याच्या दुर्गा मंदिरात चोरी
By admin | Published: February 01, 2016 11:51 PM